वॉशिंग्टन : समुद्राच्या अथांग खोलीत दडलेली रहस्ये आजही वैज्ञानिकांना थक्क करत आहेत. 2022 मधील एका संशोधन मोहिमेदरम्यान, वैज्ञानिकांना पॅसिफिक (प्रशांत) महासागराच्या तळाशी असे काहीतरी दिसले ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. हवाई बेटांच्या उत्तरेला असलेल्या ‘लिलीउओकलानी रिज’ या भागात समुद्रतळावर चक्क पिवळ्या विटांनी बनवलेल्या रस्त्यासारखी रचना आढळून आली आहे.
‘नॉटिलस’ नावाच्या संशोधन जहाजाद्वारे हा शोध लावला गेला. हे जहाज ‘पापाहानाउमोकुआकेआ मरीन नॅशनल मॉन्यूमेंट’ या भागात सर्वेक्षण करत होते. हे क्षेत्र जगातील सर्वात मोठ्या सागरी संरक्षित क्षेत्रांपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे, आजपर्यंत मानवाने या संपूर्ण क्षेत्राच्या समुद्रतळाचा केवळ 3 टक्के भागच पाहिला आहे. संशोधन पथकाने जेव्हा रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे वाहन समुद्रात उतरवले, तेव्हा कॅमेर्यात एका वाळलेल्या तलावासारखी दिसणारी जागा कैद झाली. सुमारे 3,000 मीटर खोलीवर असलेली ही जमीन एखाद्या उन्हात तापून कडक झालेल्या जमिनीसारखी दिसत होती.
व्हिडीओ फुटेजमध्ये काही वैज्ञानिक याला ‘अटलांटिसचा रस्ता’ तर काही गमतीने ‘येलो ब्रिक रोड’ (पिवळ्या विटांचा रस्ता) म्हणताना ऐकू येत आहेत. हा रस्ता मानवनिर्मित नसून निसर्गाचा एक चमत्कार असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. हा रस्ता प्रत्यक्षात ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेला एक प्रकारचा खडक आहे. जेव्हा ज्वालामुखीच्या स्फोटानंतर खडकांचे तुकडे समुद्राच्या तळाशी साचतात, तेव्हा अशा रचना तयार होतात. या खडकांमध्ये 90 अंशांच्या कोनात भेगा पडल्या आहेत. वारंवार होणारे ज्वालामुखीचे स्फोट आणि तापमानातील बदलामुळे निर्माण झालेल्या दाबामुळे हे खडक विटांच्या आकारासारखे तुटले आहेत.
यामुळेच हा भाग एखाद्या पक्क्या रस्त्यासारखा भासतो. वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीचा बहुतांश भाग समुद्राने व्यापलेला असला, तरी मानवाने त्याचा अतिशय छोटा हिस्सा पाहिला आहे. 2025 च्या एका अभ्यासानुसार, गेल्या 67 वर्षांत मानवाने खोल समुद्रतळाचा केवळ 0.0006 ते 0.001 टक्के भागच कॅमेर्यात पाहिला आहे. हा ‘येलो ब्रिक रोड’ जरी काल्पनिक जगातील रस्त्यासारखा दिसत असला, तरी तो पृथ्वीची अंतर्गत रचना समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्राच्या खोलीत अद्यापही अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, ज्यांचा शोध लागणे बाकी आहे.