WWE Rinku Singh | ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ स्टार रिंकू बनला प्रेमानंद महाराजांचा सेवेकरी 
विश्वसंचार

WWE Rinku Singh | ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ स्टार रिंकू बनला प्रेमानंद महाराजांचा सेवेकरी

पुढारी वृत्तसेवा

मथुरा : वृंदावनमधील प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यातील एका व्यक्तीला पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. प्रसिद्धी, ग्लॅमरचे जग सोडून एक माणूस आश्रमात चक्क झाडू मारताना दिसतोय. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हे तर भारताच्या वतीने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये खेळलेला कुस्तीपटू रिंकू सिंग ऊर्फ वीर आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्याचे वेगळेच रूप दिसत असून, तो चक्क रस्त्यावर झाडू मारताना दिसतो. रिंकू सिंग हा एक प्रसिद्ध बेसबॉल खेळाडूही आहे. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्य वाटले. क्रीडा जगतात आपल्या सामर्थ्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी ओळखला जाणारा माणूस इतका नम्र आहे, हे पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. रिंकू आता प्रेमानंद महाराजांचा सेवेकरी बनला असून, तो त्यांच्या सुरक्षाकवचामधील सदस्यापासून ते झाडलोट करणार्‍या सेवेकर्‍यांपर्यंत सर्वत्र दिसून येतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये रिंकू सिंगचे थक्क करणारे ‘ट्रान्सफॉर्मेशन’ दाखवण्यात आले आहे. व्हिडीओची सुरुवात माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटूच्या वेगवेगळ्या हायलाईटस्सह होते. त्यानंतर तो कपाळावर टिळा घेऊन साधूच्या वेशात रस्त्यावर झाडू मारताना दिसू शकतो. व्हिडीओमध्ये तो प्रथम बेसबॉल खेळाडू कसा बनला, नंतर डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये कसा गेला आणि शेवटी अध्यात्माकडे कसा वळला याचा त्याचा प्रवास दाखवला आहे. व्हिडीओसह एक कॅप्शन देखील शेअर केले गेले आहे, ‘बेसबॉल, डब्ल्यूडब्ल्यूई ते वृंदावन...रिंकू सिंगचे आध्यात्मिक बदल, असं त्यात लिहिण्यात आले आहे.

87 मैल प्रतितास वेगाने बेसबॉल फेकल्यानंतर रिंकू सिंगच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात कशी झाली याबद्दलच्या प्रवासावरही या व्हिडीओमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. व्यावसायिक बेसबॉल खेळणारा रिंकू सिंग हा पहिला भारतीय ठरला. अमेरिकन मायनर लीगमध्ये अनेक हंगाम घालवले. त्याच्या बेसबॉल प्रवासावर, 2014 मध्ये डिस्नेने ‘मिलियन डॉलर आर्म’ नावाचा एक चित्रपटही बनविला होता. हा चित्रपट त्याच्या आणि दिनेश पटेलच्या सत्य कथेवर आधारित आहे, ज्यांना स्पोर्टस् एजंट जेबी बर्नस्टीनने एका रिअ‍ॅलिटी शो स्पर्धेत शोधले होते. ‘द ग्रेट खली’नंतर रिंकू सिंगने 2018 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईच्या विश्वात प्रवेश केला.

रिंकू सिंगला रिंगमध्ये ‘वीर महान’ म्हणून ओळखले जात होते. त्याने जॉन सीना आणि द ग्रेट खली सारख्या मोठ्या नावांशी स्पर्धा केली. कपाळावर टिळा, पारंपरिक भारतीय पोशाख आणि रुद्राक्षाचा हार परिधान करून त्याने डब्ल्यूडब्ल्यूईच्या मंचावर एक वेगळी ओळख दिली. व्हिडीओचा सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे प्रेमानंद महाराज यांच्याशी त्याचे संभाषण. आध्यात्मिक गुरु त्यांना सांगतात, ‘जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या जगासाठी पात्र आहात, तर या.’ ज्यावर रिंकू हसतो आणि हात जोडून हळूहळू उत्तर देतो. त्याचा नवा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT