Youngest CA of World
जगातील सर्वात कमी वयातील चार्टर्ड अकौंटंट. Pudhari File Photo
विश्वसंचार

तेराव्या वर्षीच दहावी, एकोणिसाव्या वर्षी सीए!

पुढारी वृत्तसेवा

भोपाळ : अतिशय कमी वयातच बुद्धिमत्तेची चमक दाखवणारी अनेक मुले-मुली असतात. अशाच एका मुलीची आता गिनिज बुकमध्ये नोंद झालेली आहे. मध्य प्रदेशातील मुरैना येथील नंदिनी अग्रवाल हिने जगातील सर्वात लहान वयात चार्टर्ड अकौंटंट (सीए) बनून गिनिज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद केली. ती सीए झाली त्यावेळी 19 वर्षे वयाची होती. विशेष म्हणजे तिने वयाच्या तेराव्या वर्षीच दहावी व पंधराव्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली होती.

कमी वयातच सीए बनण्याचे ध्येय

नंदिनी एक बुद्धिमान आणि मेहनती विद्यार्थिनी आहे. शाळेत आलेल्या एका गिनिज बुक विक्रमवीरापासून प्रेरणा घेऊन आपणही असे काहीतरी करून दाखवावे, असे तिने लहान वयातच ठरवले होते. त्यासाठी तिने कमी वयातच सीए बनण्याचे ध्येय ठेवले होते. 2021 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी तिने सीए फायनल एक्झाममध्ये 800 पैकी 614 (76.75 टक्के) गुणांसह ऑल इंडिया रँक 1 मिळवली होती. ज्यावेळी हा रिझल्ट आला, त्यावेळी तिचे वय 19 वर्षे 330 दिवसांचे होते, त्यामुळे तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली. तिच्या या यशात भावाचेही योगदान आहे. तिचा हा भाऊही सीएची तयारी करीत होता. या अभ्यासात येणार्‍या अडचणींबाबत त्याने बहिणीला मार्गदर्शन केले होते. नंदिनीने फायनल मेरीट लिस्टमध्ये पहिले स्थान मिळवले, तर भावाने त्याच परीक्षेत 18 वे स्थान मिळवले आहे.

SCROLL FOR NEXT