World Ugliest Dog Winner | सर्वात कुरूप श्वानाला मिळाले ४ लाखांचे बक्षीस! 
विश्वसंचार

World Ugliest Dog Winner | सर्वात कुरूप श्वानाला मिळाले ४ लाखांचे बक्षीस!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : जगात तुम्ही आजवर सौंदर्याच्या अनेक स्पर्धा पाहिल्या असतील; पण कॅलिफोर्नियामध्ये एक अशी अनोखी स्पर्धा पार पडली जिथे सौंदर्याचा नव्हे, तर कुरूपतेचा उत्सव साजरा करण्यात आला. १४ ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या ‘वर्ल्ड्स अग्लिएस्ट डॉग कॉन्टेस्ट’मध्ये ‘जिन्नी लू’ नावाच्या ६ वर्षांच्या पग प्रजातीच्या कुत्रीने बाजी मारली आहे. जिन्नी लूने तिच्या विचित्र रंगरुपाने आणि अनोख्या अदांनी परीक्षकांची मने जिंकून २०२६ च्या ‘सर्वात कुरूप कुत्र्या’चा किताब आपल्या नावावर केला.

कॅलिफोर्नियातील सांता रोसा येथील सोनोमा काउंटी फेअरग्राऊंड्समध्ये ‘सोनोमा-मरीन ॲग्रीकल्चरल असोसिएशन’द्वारे या स्पर्धेचे ५० वे वर्ष थाटामाटात साजरे करण्यात आले. या शोमध्ये जगभरातून आलेल्या विचित्र दिसणाऱ्या कुत्र्यांनी रॅम्प वॉक केला. कुत्र्यांमधील वेगळेपणाचा स्वीकार करणे आणि प्राण्यांना दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ‘वर्ल्ड्स अग्लिएस्ट डॉग २०२६’चा किताब जिंकल्यानंतर जिन्नी लूची मालकीण मिशेल ग्रेडी यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

या विजयासाठी त्यांना MUG रूट बिअरतर्फे ५,००० डॉलर्स (सुमारे ४,७७,२५२ भारतीय रुपये) ची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. मिशेल यांच्या मते, जिन्नी लूचा हा चौथा प्रयत्न होता आणि अखेर तिची ही चिकाटी कामी आली. MUG ने जारी केलेल्या निवेदनानुसार, जिन्नी लूला चार वर्षांपूर्वी ‘पग रेस्क्यू’च्या माध्यमातून दत्तक घेण्यात आले होते. तेव्हापासून ती तिच्या कुटुंबासाठी भरपूर आनंद घेऊन आली आहे. जिन्नी लूला अशा स्पर्धांमध्ये भाग घेणे, नवीन लोकांना भेटणे आणि या कार्यक्रमाचा भाग बनणे खूप आवडते, असे मिशेल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT