World Tallest Church | जगातील सर्वात उंच चर्च आता घरात आणता येणार 
विश्वसंचार

World Tallest Church | जगातील सर्वात उंच चर्च आता घरात आणता येणार

पुढारी वृत्तसेवा

बार्सिलोना : स्पेनमधील बार्सिलोना येथील प्रसिद्ध 'सग्राडा फॅमिलीया' हे चर्च तब्बल १४४ वर्षांनंतर अखेर पूर्णत्वाकडे सरकत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, जगप्रसिद्ध खेळणी उत्पादक कंपनी 'लेगो'ने या भव्य वास्तूची एक लहान, पण हुबेहूब प्रतिकृती बाजारात आणली आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद अँटोनी गौडी यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त लेगोने ही विशेष आदरांजली वाहिली आहे.

या मॉडेलची रचना अत्यंत गुंतागुंतीची आणि भव्य आहे. हे मॉडेल तयार करण्यासाठी ग्राहकांना तब्बल १२,०६० छोटे तुकडे एकमेकांना जोडावे लागणार आहेत. मूळ चर्चची उंची १७२.५ मीटर (जगातील सर्वात उंच चर्च) आहे, तर लेगोचे हे मॉडेल ६२ सेंटिमीटर (२४ इंच) उंच असेल. या भव्यतेमुळे त्याची किंमतही तितकीच भारी आहे; या सेटसाठी ग्राहकांना तब्बल $ ७९९.९९ (सुमारे ६६,००० रुपये) मोजावे लागतील. सध्या याचे प्री-ऑर्डर बुकिंग सुरू झाले असून, १ नोव्हेंबरपासून ते ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

या लेगो सेटचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील रंगीबेरंगी काचांचा प्रभाव, जो अगदी मूळ चर्चमध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशासारखा भासतो. लेगोचे डिझाईन मास्टर रोक झ्गालिन कोबे म्हणाले, "गौडी यांच्या संकल्पनेचा आदर करत, या वास्तूची गुंतागुंत आणि सौंदर्य अचूकपणे टिपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे." १८८२ मध्ये या चर्चचे बांधकाम सुरू झाले होते. १९२६ मध्ये जेव्हा गौडी यांचा मृत्यू झाला, तेव्हा केवळ १० ते १५ टक्केच काम पूर्ण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT