Chandrodaya Temple Vrindavan | वृंदावनमध्ये साकारले जगातील सर्वात उंच ‘चंद्रोदय मंदिर’ 
विश्वसंचार

Chandrodaya Temple Vrindavan | वृंदावनमध्ये साकारले जगातील सर्वात उंच ‘चंद्रोदय मंदिर’

पुढारी वृत्तसेवा

वृंदावन: उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे देशातील सर्वात विशाल, भव्य आणि उंच ‌‘चंद्रोदय मंदिर‌’ आता पूर्णत्वाकडे आले आहे. या महिनाअखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मंदिर प्रशासनाने पंतप्रधानांना निमंत्रण धाडले असून, सध्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. वृंदावन-छटीकरा मार्गावरील अक्षय पात्र परिसरात हे मंदिर साकारले आहे. हे मंदिर दिल्लीच्या कुतुब मीनारपेक्षा तब्बल तीनपट उंच असणार आहे.

८ मार्च २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या मंदिराचा शिलान्यास केला होता. १६ नोव्हेंबर २०१४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याची पायाभरणी केली होती. इस्कॉन बंगळूरद्वारे सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून हे ७० मजली मंदिर बांधले जात आहे. या मंदिराची उंची २१० मीटर इतकी असल्याने त्याच्या पायाभरणीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. मंदिराचा पाया ५५ मीटर खोल आहे, तर त्याचा आधार १२ मीटर उंच आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईच्या बुर्ज खलिफाचा पाया ५० मीटर खोल आहे, त्या तुलनेत या मंदिराचा पाया अधिक खोल आहे. हे मंदिर इतके उंच आहे की, त्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर बसवण्यात येणाऱ्या टेलिस्कोपच्या साहाय्याने ८० किलोमीटर अंतरावर असलेला आर्ग्याचा ‌‘ताजमहल‌’ स्पष्टपणे पाहता येणार आहे.

मंदिराच्या पहिल्या तीन मजल्यांवर चैतन्य महाप्रभु, राधा-कृष्ण आणि बलराम यांची मंदिरे असणार आहेत. हे मंदिर द्रविड, नागर आणि आधुनिक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असेल. इथे भाविकांना ४डी तंत्रज्ञानाद्वारे देवलोक आणि देवलीलांचे दर्शन घेता येईल. मंदिराभोवती कृत्रिम नैसर्गिक वने तयार करण्यात आली आहेत. परिसरात यमुना नदीचे प्रतिरूप तयार करण्यात आले असून, तिथे नौकाविहाराची सुविधाही उपलब्ध असेल. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम मिळालेला नसला तरी, २५ ते ३० मे दरम्यान पंतप्रधान मथुरा दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान ते मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा-अर्चा करतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करण्याचीही शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT