वेलिंग्टन : तुम्ही आजपर्यंत अनेक पक्ष्यांबाबत ऐकलं असेल. काही माणसांसोबत खूप लवकर ‘फ्रेंडली’ होतात, तर काही त्यांच्या आवाजाने ‘इरिटेड’ करतात. एक पक्षी असा आहे, जो कारचा शत्रू म्हणून ओळखला जातो. कारण, हा पक्षी गाडीवर येताच तो त्या वाहनाचे अनेक महत्त्वाच्या पार्टस् चा खुळखुळा करून ठेवतो. हा पक्षी म्हणजे न्यूझीलंडची केआ चिमणी. पोपटासारखी दिसणारी ही चिमणी जगातील सर्वात बुद्धिमान पक्ष्यांपैकी एक समजली जाते. पण, या पक्ष्याचा एक खोडसाळपणा असा आहे, जो अनेकांचं नुकसान करू शकतो.
घाटमाथ्यावर अनेकदा लोक जेव्हा त्यांच्या कारने फिरायला जातात, तेव्हा ही केआ चिमणी या गाड्यांचे पार्टस् उघडे करते. जर तुम्ही न्यूझीलंडच्या अल्पाईन परिसरात असाल, तर तुम्हाला या पक्ष्यापासून खूपच सावध राहण्याची आवश्यकता आहे. कारण, ही चिमणी पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारवर चोचीने हल्ला करते. तसेच कारवर लावलेले रबर, विंडो सील, वायपर, ॲटिना, हेडलाईट रबर, तसेच टायरलाही खेचून बाहेर काढते.
याच कारणामुळे लोक या चिमणीला कारचा मोठा शत्रू मानतात. ही चिमणी डोंगर भागात वावरते. हा पक्षी ५० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं म्हणतात. न्यूझीलंड सरकारने केआ पक्ष्याचं रक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. जर या पक्ष्याला कोणी मारलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. पर्यटकांनी त्यांच्या गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याच्या सूचना दिल्या जातात. तसेच या पक्ष्यापासून लोकांना दूर राहण्यासाठीही सांगितलं जातं.