जगातील सर्वात लहान तापमापक. Pudhari File Photo
विश्वसंचार

जगातील सर्वात लहान तापमापक

यात नैसर्गिक व मानवनिर्मित नॅनो तंत्रज्ञानाचा वापर

पुढारी वृत्तसेवा

माँट्रियल : सर्वात लहान किंवा मोठ्या आकाराच्या वस्तू नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्याच्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या काळात अत्यंत सूक्ष्म अशा वस्तूही बनवल्या जात आहेत. वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान तापमापक तयार केलेला असून, तो मानवी केसापेक्षा वीस हजार पटींनी लहान आहे. डीएनएच्या रचनांचा वापर करून तो तयार केला आहे. विशिष्ट तापमानाला घडी घातल्या जाणार्‍या तर विशिष्ट तापमानाला उलगडत जाणार्‍या जनुकांचा वापर त्यात केला आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे.

साठ वर्षांपूर्वी या एका शोधानुसार डीएनएचे रेणू आपली माहिती सांकेतिक भाषेत ठेवत असतात; पण उष्णता मिळाल्यावर ही माहिती उघड होते. कॅनडातील मॉन्ट्रियल विद्यापीठाचे प्राध्यापक अलेक्सिस बेलिस्ले यांनी सांगितले, की अलीकडील काही वर्षांत जैव रसायनशास्त्रज्ञांनी जैवरेणू म्हणजे प्रथिने किंवा आरएनए (डीएनएसारखाच एक रेणू) यांचा वापर नॅनो तापमापक म्हणून केला आहे. डीएनएचे उलगडणे व गुंडाळणे यांचा वापर करून त्यात तापमान मोजले जाते. या नैसर्गिक तापमापकांवरून प्रेरणा घेऊन डीएनए तापमापक तयार केले आहेत. ते मानवी केसापेक्षा 20 हजार पट लहान आहेत व आम्ही अशा डीएनए रचना तयार केल्या आहेत, ज्या विशिष्ट तापमानाला उकलतात व तापमान मोजले जाते. याचा महत्त्वाचा फायदा असा, की डीएनएचा वापर करून रेण्वीय तापमापक तयार केले आहेत. त्यात डीएनएच्या रासायनिक गुणांचा वापर केला आहे. डीएनए हा चार वेगवेगळ्या रेणूंचा बनलेला असतो. त्यात न्युक्लिओटाईड ए हा न्युक्लिओटाईड टी या रेणूशी कमकुवत बंधाने जोडलेला असतो, तर न्युक्लियोटाईड सी हा न्युक्लिओटाईड जी बरोबर जास्त घट्ट बांधलेला असतो असे मॉन्ट्रियल विद्यापीठाचे डेव्हिड गॅरो यांचे मत आहे. या साधारण रचनांचा उपयोग करून काही डीएनए रचना अशा तयार केल्या ज्या विशिष्ट तापमानाला गुंडाळल्या किंवा उलगडल्या जातील. डीएनए रचनांना प्रकाशीय संवेदक जोडले जातात व त्यामुळे 5 नॅनोमीटर आकाराचे तापमापक तयार करणे शक्य होते, असे मॉन्ट्रियल विद्यापीठाचे अमाद डेसोरियर्स यांनी सांगितले. हे नॅनो तापमापक म्हणजे नॅनो तंत्रज्ञानाची नवीन शाखा ठरणार आहेत व त्यामुळे रेणवीय जीवशास्त्राचे नवे आकलन होणार आहे. ‘नॅनो लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT