न्यूयॉर्क गंगा, ब्रह्मपुत्रा, नाईल आणि अमेझॉन या नद्या त्यांच्या प्रचंड लांबी आणि भव्यतेसाठी ओळखल्या जातात; पण तुम्हाला माहित आहे का की, जगात एक अशी नदी आहे जी एखाद्या ओढ्यासारखी किंवा झर्यासारखी आहे? होय, अशी एक नदी आहे, जिची लांबी-रुंदी अतिशय कमी आहे. ही नदी आहे रोहेन नदी, जी अमेरिकेच्या मोंटाना राज्यात स्थित आहे. अवघ्या 61 मीटर (201 फूट) लांबीची ही नदी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी नदी म्हणून नोंदवली गेली आहे.
रोहेन नदी ग्रेट फॉल्स परिसरात आहे. ती जायंट स्प्रिंग्स या नैसर्गिक झर्यातून उगम पावते आणि थेट मिसुरी नदीत विलीन होते. जायंट स्प्रिंग्स स्वतः अमेरिकेतील सर्वात मोठ्या नैसर्गिक झर्यांपैकी एक आहे. एखाद्या जलधारेची नदी म्हणून मान्यता मिळण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात, जसे की, निरंतर जलप्रवाह असणे व स्वतःचा स्रोत आणि संगम असणे. रोहेन नदी हे दोन्ही निकष पूर्ण करते म्हणून तिला अधिकृत नदी मानले जाते. तिच्या आकारामुळे ती कधी कधी एका छोट्या झर्यासारखी वाटते; पण ती खरंच एक नदी आहे. जगातील सर्वात छोटी नदी म्हणून तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये 1989 मध्ये नोंद झाली. या नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि थंड आहे. कारण, ती थेट नैसर्गिक झर्यातून वाहते. तांत्रिकद़ृष्ट्या इंडोनेशियामधील तमब्रासी नदी ही 20 मीटर (65 फूट) लांबीची आहे; पण ती अधिकृतपणे नोंदली गेली नाही. कारण, काही संशोधक तिला एक छोटा झरा मानतात. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार रोहेन नदी अजूनही जगातील सर्वात छोटी नदी आहे.