world's smallest QR code | जगातील सर्वात लहान क्यूआर कोड 
विश्वसंचार

world's smallest QR code | जगातील सर्वात लहान क्यूआर कोड

जीवाणूपेक्षाही सूक्ष्म, जो टिकेल हजारो वर्षे!

पुढारी वृत्तसेवा

व्हिएन्ना : तंत्रज्ञानाच्या युगात माहिती साठवण्यासाठी आपण पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क किंवा क्लाऊड स्टोअरेज वापरतो. पण हे पर्याय फार काळ टिकत नाहीत. यावर उपाय म्हणून ऑस्ट्रियातील ‘टीयू व्हिएन्ना’ विद्यापीठ आणि ‘सेराबाईट’ कंपनीच्या संशोधकांनी एक क्रांतिकारी शोध लावला आहे. त्यांनी जगातील इतका लहान क्यूआर कोड तयार केला आहे की, तो पाहण्यासाठी साध्या सूक्ष्मदर्शकाची नाही, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज भासते. या विक्रमी क्यूआर कोडची नोंद आता अधिकृतपणे ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली आहे.

ठळक वैशिष्ट्ये : आकार : फक्त 1.98 चौरस मायक्रोमीटर (बहुतेक जीवाणूंहूनही लहान). क्षमता : एका A4 आकाराच्या कागदावर तब्बल 2 टेराबाईटस् (2 TB) डेटा साठवता येऊ शकतो. टिकाऊपणा : हा डेटा शेकडो किंवा हजारो वर्षे सुरक्षित राहू शकतो. टीयू व्हिएन्ना येथील मटेरिअल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रा. पॉल मेयरोफर यांनी सांगितले की, आम्ही तयार केलेली रचना इतकी सूक्ष्म आहे की, ती ऑप्टिकल मायक्रोस्कोपने दिसूच शकत नाही. आम्ही वैयक्तिक अणूंच्या पातळीवर न जाता सिरॅमिक पदार्थाचा वापर करून एक स्थिर आणि वारंवार वाचता येईल असा कोड तयार केला आहे.

या कोडमधील प्रत्येक पिक्सेलचा आकार केवळ 49 नॅनोमीटर आहे. हे दृश्य प्रकाशाच्या लहरीपेक्षा दहापट लहान आहे. संशोधकांनी याचे वर्णन करताना म्हटले की, एखाद्या हत्तीच्या जाड पायाने ब—ेल लिपी वाचण्याचा प्रयत्न करणे जितके अशक्य आहे, तितकेच साध्या प्रकाशात हा कोड पाहणे अशक्य आहे. आजचे चुंबकीय किंवा इलेक्ट्रॉनिक स्टोअरेज काही वर्षांत खराब होऊ शकते. मात्र, या संशोधनासाठी उच्च दर्जाच्या ‘थिन सिरॅमिक फिल्म’चा वापर करण्यात आला आहे. हे तेच साहित्य आहे, जे अत्यंत कठीण यंत्रांच्या कोटिंगसाठी वापरले जाते.

आयन बीमच्या सहाय्याने या सिरॅमिक थरावर डेटा कोरला जातो, ज्यामुळे तो अत्यंत कठीण परिस्थितीतही नष्ट होत नाही. आजच्या मोठ्या डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी आणि चालवण्यासाठी प्रचंड वीज लागते. यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. याउलट सिरॅमिक स्टोअरेजला डेटा जतन करण्यासाठी कोणत्याही उर्जेची किंवा कूलिंगची गरज भासत नाही. प्राचीन संस्कृतींनी आपली माहिती दगडावर कोरली होती, जी आजही शाबूत आहे. आम्ही आधुनिक युगात तीच पद्धत सिरॅमिकच्या माध्यमातून अवलंबत आहोत, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी आमचा डेटा सुरक्षित राहील, असे संशोधक अलेक्झांडर किर्नबॉअर यांनी नमूद केले.

पुढील पाऊल

हा नवा जागतिक विक्रम जुन्या विक्रमाच्या तुलनेत केवळ 37 टक्के आकाराचा आहे. संशोधक आता डेटा लिहिण्याचा वेग वाढवण्यासाठी आणि हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर काढून औद्योगिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे भविष्यात माहिती साठवण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT