Mexico Blue Hole discovery | मेक्सिकोच्या खाडीत सापडले जगातील दुसरे सर्वात मोठे ‘ब्लू होल’ File Photo
विश्वसंचार

Mexico Blue Hole discovery | मेक्सिकोच्या खाडीत सापडले जगातील दुसरे सर्वात मोठे ‘ब्लू होल’

पुढारी वृत्तसेवा

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या चेतुमल खाडीच्या शांत पाण्याखाली एक अत्यंत खास शोध लागला आहे. तिथे हे मोठे ‘ब्लू होल’ सापडले आहे, ज्याला ताम जा ब्लू होल असे नाव देण्यात आले आहे. हे जगातील दुसरे सर्वात मोठे महासागरीय ‘ब्लू होल’ मानले जाते आणि हा पाण्याखालील सिंकहोल तब्बल 274 मीटर (900 फूट) खोल जातो. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘फ्रंटियर्स’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.

या अभ्यासातील संशोधक या पाण्याखालील विवराच्या जटिल जल-पारिस्थितिकी तंत्राची (Hydro- Ecosystem) आणि भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांची तपासणी करत आहेत. मेक्सिकोच्या युकाटन द्वीपकल्पात असलेला हा खड्डा शास्त्रज्ञांना एका वेगळ्याच जगाची झलक देतो. माया भाषेत ‘ताम जा’ या नावाचा अर्थ ‘खोल पाणी’ असा आहे. वरून पाहिल्यास हा खोल गोलाकार भाग सुमारे 1,47,000 चौरस फूट (जे अनेक शहरी ब्लॉक्स इतके मोठे आहे) समुद्राचा तळ व्यापतो. याला खास बनवतात त्याच्या चुनखडीने बनलेल्या आणि सरळ खाली जाणार्‍या भिंती. ब्लू होलच्या पृष्ठभागावर सूक्ष्मजीवांचा एक थर जमा झालेला आहे.

या भागात पाणी खारट आणि ऑक्सिजनयुक्त असते, जिथे खाडीतील छोटे जीव वाढतात. मात्र, खालच्या बाजूला परिसर झपाट्याने बदलतो. येथे ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते आणि जीवन फक्त खास सूक्ष्मजीव आणि काही चिवट जीवांपर्यंत मर्यादित राहते. याखाली पाण्याचे तापमान आणि क्षाराचे प्रमाण अचानक बदलते, याला ‘केमोकलाईन’ म्हणतात, जिथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे थर एकत्र येतात.

छिद्राच्या अगदी तळाशी एक असा प्रदेश आहे जिथे ऑक्सिजन जवळपास नाहीच. या कठीण वातावरणात विरघळलेले मीठ, नायट्रोजन आणि सल्फर मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे हायड्रोजन सल्फाईड नावाचा विषारी वायू तयार होण्यास मदत होते, ज्याचा वास सडलेल्या अंड्यांसारखा असतो. हा अभ्यास सांगतो की, ताम जा ब्लू होल केवळ एक वैज्ञानिक आश्चर्य नसून, एक पारिस्थितिकी प्रयोगशाळादेखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT