अहमदाबाद : गाव म्हटलं की, एक पार, एखाद्या देवाचं मंदिर, मातीची घरं, विहीर, हिरवीगार शेतं, राबणारे साधे लोक, विहिरीवरून पाणी शेंदणार्या महिला असे काहीसे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते; पण भारतातील हे गाव या सर्व प्रतिमेला छेद देते. या गावात सगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध आहे. 24 तास वीज आहे, अनेक दिग्गज बँका आहेत. मोठा दवाखाना आहे. अद्ययावत अशी डिजिटल शाळा आहे. या गावात शहरासारख्या अनेक सोयी-सुविधा आहेत. या गावात लखपतीच नाही तर करोडपती लोक राहतात. हे भारतातीलच नाही, तर जगातील सर्वात श्रीमंत खेडं आहे.
हे गाव गुजरात राज्यात आहे. ‘माधापर’ हे त्याचे नाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्या आता एक लाखांच्या आसपास 92,000 इतकी आहे. या गावात 7,600 इतकी घरं आहेत. या एकट्या गावात 17 बँकांच्या शाखा आहेत. या गावाची आर्थिक स्थिती अगदी मजबूत आहे. या गावातील रहिवाशांचे या बँकांमध्ये 5 हजार कोटींहून अधिक रुपये जमा आहेत. एखाद्या मोठ्या तालुक्याच्या गावाला, मोठ्या शहरात सुद्धा इतकी आर्थिक उलाढाल होत नाही. तर माधापरचे अनेक कुटुंब हे व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झाले आहेत.
अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये या लोकांच्या उद्योगांना भरभराट आली आहे; पण ही मंडळी त्यांची पाळंमुळं विसरली नाहीत. बाहेरील ही मंडळी, ही अनिवासी भारतीय त्यांच्या कुटुंबीयांना दरमहा मोठी रक्कम पाठवतात. ही मंडळी गावाच्या विकासातही मोठे योगदान देत आहेत. गावातील शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कार्यात ते भरभरून मदत करतात. त्यांनी हे गाव आधुनिक बनवण्यासाठी मोठा वाटा उचलला आहे. 12 व्या शतकात माधापर गाव वसले.
कच्छच्या मिस्त्री समुदायाने या गावाची पायाभरणी केली. या समाजाने गुजरातच नाही तर भारतभरात अनेक महत्त्वाची कोरीव आणि आखीव मंदिरं बांधली. अनेक ऐतिहासिक इमारती बांधल्या. पुढे या गावात अनेक समुदायाचे लोक जमा झाले. आज हे गाव विविध संस्कृतींचा चेहरा झाले आहे. माधापरमध्ये शाळा, महाविद्यालये, बँका, आरोग्य केंद्रे, बागबगिचे, रस्ते आणि शहराला लाजवतील अशा सुविधा आहेत. या गावची जीवनशैली, राहणीमान आणि सुविधा शहरापेक्षा चांगले आहे.