World’s Oldest Poisonous Weapons |मानवी इतिहासातील सर्वात जुनी विषारी शस्त्रे सापडली 
विश्वसंचार

World’s Oldest Poisonous Weapons |मानवी इतिहासातील सर्वात जुनी विषारी शस्त्रे सापडली

60,000 वर्षांपूर्वीचे शिकारीचे तंत्र पाहून शास्त्रज्ञ थक्क!

पुढारी वृत्तसेवा

जोहान्सबर्ग (द. आफ्रिका) : मानवाच्या प्रगत विचारसरणीचा आणि शिकारीच्या कौशल्याचा एक मोठा पुरावा दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. वैज्ञानिकांना तब्बल 60,000 वर्षे जुन्या बाणांच्या टोकांवर (अ‍ॅरोहेडस्) विषाचे अंश सापडले आहेत. या शोधामुळे मानवाकडून विषारी शस्त्रांच्या वापराचा इतिहास आता 50,000 वर्षांनी मागे गेला आहे. हे संशोधन जानेवारी 2026 मध्ये ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल प्रांतातील उम्हलतुझाना रॉक शेल्टर येथे झालेल्या उत्खननात स्फटिकापासून (क्वार्टझ) बनवलेली ही छोटी बाणाची टोके सापडली. संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या टोकांवर बुफानिड्रिन आणि एप्यूबुफॅनिसिन नावाच्या विषारी घटकांचे अवशेष शोधले आहेत. हे विष आजही दक्षिण आफ्रिकेत आढळणार्‍या गिफबॉल नावाच्या झाडापासून तयार केले जाते. हे विष प्राण्याला त्वरित मारण्यासाठी नव्हते, तर त्याला कमकुवत करण्यासाठी वापरले जायचे. यामुळे शिकार्‍याला जखमी प्राण्याचा पाठलाग करणे सोपे जात असे.

स्टॉकहोम विद्यापीठाचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ स्वेन इसाकसन यांच्या मते, यापूर्वी विषारी शस्त्रांचे सर्वात जुने पुरावे केवळ 7,000 ते 9,000 वर्षांपूर्वीचे होते. मात्र, 60,000 वर्षांपूर्वीचे हे अवशेष सिद्ध करतात की, त्या काळातील मानवाकडे निसर्गातील रसायनशास्त्राचे सखोल ज्ञान होते. विषारी बाण बनवणे ही एक साधी प्रक्रिया नाही. यासाठी वनस्पती ओळखणे, त्यातून विष काढणे आणि ते बाणावर कसे टिकेल याचे नियोजन करणे आवश्यक असते. हे सर्व मानवाच्या कॉग्निटिव्ह म्हणजेच प्रगत मानसिक क्षमतेचे दर्शन घडवते. यामुळे आदिमानव केवळ शारीरिक शक्तीवर नाही, तर बुद्धिमत्तेच्या जोरावर शिकार करत होता हे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT