वॉशिंग्टन : शांतता कुणाला आवडत नाही? पण काही वेळा अतिशांत वातावरण भयावह बनत असते. जगात अशी एक खोली आहे, जिथे तुम्हाला पिन-ड्रॉप शांतता जाणवेल. या ठिकाणी शांतता इतकी तीव्र आहे की लोकांना त्यांच्या हृदयाचे ठोके अनेक पटींनी जास्त ऐकू येतात. या खोलीला ‘अॅनेकोइक चेंबर’ असे नाव आहे. ही खोली मायक्रोसॉफ्टच्या अमेरिकेतील मुख्यालयात आहे. ही खोली इतकी शांत आहे की येथील आवाजाची पातळी शून्यापेक्षाही खाली जाते. म्हणजे येथील आवाज आपल्या कानांना ऐकू येणार्या किमान ध्वनीपेक्षाही कमी आहे. मात्र ही खोली जितकी शांत आहे तितकीच धोकादायक आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
अॅनेकोइक चेंबरची निर्मिती ही ध्वनीची अचूक चाचणी करण्यासाठी करण्यात आलेली आहे. या रुमच्या भिंती, छत आणि फरशीमध्ये कोणत्याही आवाजाला प्रतिध्वनी देण्याची क्षमता नाही. मायक्रोफोन, स्पीकर्स, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि कीबोर्ड यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आवाजाची चाचणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. ही रूम तयार करण्यासाठी जाड स्टीलच्या भिंती, जाड काँक्रीट आणि विशेष फायबरग्लास कोटिंग वापरण्यात आली आहे. यामुळे या रूमच्या भिंती ध्वनी शोषून घेतात, म्हणजेच कोणताही आवाज भिंतीवरून आदळून परत येत नाही.
हे संपूर्ण चेंबर एका मोठ्या काँक्रीट बॉक्समध्ये. त्यामुळे आतमध्ये बाहेरील कोणतेही कंपन किंवा आवाज आत प्नवेश करत नाही. त्यामुळे इथे भयाण शांततेचा अनुभव येतो. मानवी मेंदूला नेहमीच आवाज हवा असतो. जेव्हा आवाज येत नाही तेव्हा मेंदूला शरीराची दिशा समजत नाही. त्यामुळे अनेक लोक इथे पडतात, तसेच काही लोक घाबरतात, अनेकांना चक्कर येते. त्यामुळे बहुतेक लोक या खोलीत काही सेकंद किंवा मिनिटांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाहीत. मेंदू अशा शांततेत राहिल्यास तो अतिक्रियाशील होतो. तो स्वतःचे आवाज निर्माण करू लागतो, ज्यामुळे लोक भ्रमात पडतात किंवा त्यांना खोटे आवाज ऐकू येते. अशा परिस्थितीत दीर्घकाळ राहिल्याने मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोक आतमध्ये जास्त वेळ राहू शकत नाहीत.