Most Expensive Diamond | जगातील सर्वात महागडा पिवळा हिरा 
विश्वसंचार

Most Expensive Diamond | जगातील सर्वात महागडा पिवळा हिरा

पुढारी वृत्तसेवा

जिनिव्हा : जगात हिर्‍यांचे अनेक प्रकार आहेत; पण ‘पिवळ्या हिर्‍यांची’ मोहिनी काही वेगळीच असते. जगातील सर्वात महागड्या पिवळ्या हिर्‍यांपैकी एक म्हणून ‘द ग्रॅफ व्हिव्हिड यलो’ ओळखला जातो. या हिर्‍याचे वजन तब्बल 100.09 कॅरेट आहे. एका आंतरराष्ट्रीय लिलावामध्ये या हिर्‍याची किंमत सुमारे 16.3 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 135 कोटी रुपयांहून अधिक) इतकी लावली गेली होती. या हिर्‍याचा आकार ‘कॅश्यू’ असून त्याचा रंग सोन्यासारखा लख्ख पिवळा आहे.

पिवळ्या हिर्‍याची किंमत ठरवताना काही वैज्ञानिक आणि नैसर्गिक बाबी विचारात घेतल्या जातात. हिर्‍यामध्ये जेव्हा कार्बनच्या रेणूंमध्ये नायट्रोजनचे प्रमाण मिसळले जाते, तेव्हा त्याला पिवळा रंग प्राप्त होतो. नायट्रोजनचे प्रमाण जेवढे जास्त, तेवढा पिवळा रंग गडद आणि किंमत जास्त असते. हा हिरा ‘फॅन्सी व्हिव्हिड’ या सर्वोच्च श्रेणीत मोडतो. जगभरातील एकूण हिर्‍यांपैकी केवळ 1 टक्का हिरे या श्रेणीत येतात.

100 कॅरेटपेक्षा जास्त वजन असूनही या हिर्‍यामध्ये कोणतीही त्रुटी नाही, जे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. बहुतेक महागडे पिवळे हिरे हे दक्षिण आफ्रिकेतील खाणींमधून सापडले आहेत. कच्च्या स्वरूपात सापडल्यानंतर या हिर्‍यांवर पैलू पाडण्यासाठी कित्येक महिने आणि अनुभवी कारागिरांची गरज लागते. ‘ग्रॅफ व्हिव्हिड यलो’वर पैलू पाडण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये नऊ महिने काम चालले होते. या हिर्‍याशिवाय ‘टिफनी यलो डायमंड’, ‘द कोरा सन-ड्रॉप’ आणि ‘अलनाट डायमंड’ हे पिवळे हिरेही प्रसिद्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT