काठमांडू : आजच्या डिजिटल युगात जरी आपण कीबोर्डवर टायपिंग अधिक करत असलो, तरी एक काळ असा होता की चांगल्या हस्ताक्षरासाठी शिक्षकांकडून आणि पालकांकडून आपल्याला फटकारणं सहन करावे लागायचे. मात्र काहींचे हस्ताक्षर इतके देखणे असते की ते एखाद्या संगणकीय प्रिंटसारखे वाटते. असेच एक नाव सध्या संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले आहे, प्रकृती मल्ला, नेपाळमधील रहिवासी मुलगी.
प्रकृती मल्लाचे हस्ताक्षर हे जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर असल्याचे म्हटले जाते. केवळ 14 वर्षांची असताना, आठवीत शिकत असताना तिचे एक शालेय असाइनमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालं. लोकांनी तिच्या हस्ताक्षराचे भरभरून कौतुक केले. काही जणांना तर हे खरे वाटले नाही की हे हस्ताक्षर आहे; त्यांना वाटले हे एखादे डिजिटल टायपोग्राफीचं उदाहरण असावं. प्रकृतीचं हस्ताक्षर इतके शुद्ध, नीटनेटके आणि सुंदर आहे की ते पाहून कोणालाही वाटेल की ते प्रिंटरने छापलेले आहे. बेदाग वळणे ( curves), अचूक स्पेसिंग आणि आकर्षक शैली यामुळे तिचे हस्ताक्षर एक कलाकृती वाटते.
या असामान्य कौशल्यामुळे प्रकृती मल्ला यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. तिला संयुक्त अरब अमीरातच्या 51 व्या ‘स्पिरिट ऑफ द युनियन’ समारंभात स्वहस्ताक्षरात लिहिलेले अभिनंदन पत्र सादर करण्याचा मान मिळाला होता. या प्रसंगी तिला खास सन्मानित करण्यात आले. याशिवाय, नेपाळच्या सैन्याने देखील त्यांना ‘राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक’ मानत सन्मान दिला आहे. प्रकृती मल्ला यांचे हस्ताक्षर हे केवळ नेपाळपुरते मर्यादित न राहता, जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. आजही सोशल मीडियावर तिच्या हस्ताक्षराचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असतात.