वॉशिंग्टन : नाईल, अॅमेझॉन आणि गंगा यांसारख्या जगातील अनेक मोठ्या नद्यांची खोरी (डेल्टा क्षेत्र) जागतिक समुद्र पातळीच्या वाढीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने खाली खचत असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे भविष्यात किनारपट्टी भागांत भीषण पूर आणि जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संशोधकांच्या मते, हवामान बदलामुळे वाढणार्या समुद्र पातळीपेक्षाही ‘जमीन खचणे’ हा घटक जमीन नष्ट होण्यासाठी आणि खार्या पाण्याच्या घुसखोरीसाठी अधिक कारणीभूत ठरत आहे. या अभ्यासातील महत्त्वाचे निष्कर्ष असे- भूगर्भातील पाण्याचा उपसा : जागतिक स्तरावर डेल्टा क्षेत्र खचण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जमिनीखालील पाण्याचा अतिवापर हे आहे. शहरीकरण : शहरांचा वाढता विस्तार आणि नद्यांमधील गाळाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमीन खचण्याचा वेग वाढला आहे.
दुहेरी संकट : समुद्र पातळी वाढणे आणि दुसरीकडे जमीन खाली जाणे, या ‘दुहेरी ओझ्यामुळे’ जगातील मोठ्या शहरांमधील लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागण्याची शक्यता आहे. वर्जिनिया टेक येथील भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक मनूचेहर शिर्झाई आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘सेंटीनेल-1’ या उपग्रहाच्या साहाय्याने 2014 ते 2023 दरम्यान जगातील 40 मोठ्या नदी खोर्यांचा अभ्यास केला. ‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
‘आमच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर जमिनीच्या खचण्याबाबत केलेला हा आजवरचा सर्वात व्यापक आणि उच्च-रिझोल्यूशनचा अभ्यास आहे, असे शिर्झाई यांनी सांगितले. अभ्यास केलेल्या 40 पैकी 18 खोर्यांमध्ये जमीन खचण्याचा वेग हा समुद्र पातळी वाढीच्या दरापेक्षा (वार्षिक 4 मिमी) अधिक आहे. मिसिसिपी, नाईल आणि गंगा-ब्रह्मपुत्रा यांसारख्या 19 खोर्यांमधील 90 टक्क्यांपेक्षा जास्त भाग खचत चालला आहे. थायलंडमधील चाओ फ्राया, इंडोनेशियातील ब्रँटास आणि चीनमधील यलो रिव्हर डेल्टा या क्षेत्रांमध्ये जमीन खचण्याचा वेग वार्षिक 8 मिमी इतका आहे, जो समुद्र पातळी वाढीच्या वेगापेक्षा दुप्पट आहे. केवळ अमेरिकेतील रिओ ग्रांदे डेल्टा वगळता, अभ्यासातील इतर सर्व खोर्यांमध्ये काही ठिकाणी जमीन अतिशय वेगाने खाली जात असल्याचे दिसून आले आहे. हे संकट केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नसून, यामुळे किनारपट्टीवर राहणार्या कोट्यवधी लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे.