कोपेनहेगन : बाल्टिक समुद्राच्या खाली डेन्मार्क आणि जर्मनीला जोडणारा एक ऐतिहासिक आणि विक्रमी बोगदा बांधला जात आहे. ‘फेहमार्नबेल्ट’ (Fehmarnbelt) नावाचा हा 18 किलोमीटर लांब बोगदा स्कॅन्डिनेव्हियन देशांना उर्वरित युरोपशी जोडण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा जगातील सर्वात लांब ‘प्री-फॅब्रिकेटेड’ (आधीच तयार केलेला) रस्ते आणि रेल्वे बोगदा असेल.
‘लेगो’सारखी जोडणी
सहसा समुद्राखालील बोगदे (उदा. ब्रिटन आणि फ्रान्समधील चॅनल टनेल) जमिनीच्या खाली खोदकाम करून बनवले जातात. मात्र, फेहमार्नबेल्टचे तंत्र वेगळे आहे. येथे बोगद्याचे 90 महाकाय भाग जमिनीवर तयार करून ते समुद्राच्या तळावर एकमेकांना जोडले जाणार आहेत, अगदी एखाद्या ‘लेगो’ ब्लॉकप्रमाणे.
प्रवासाचा वेळ तासांवरून मिनिटांवर
हा बोगदा पूर्ण झाल्यावर प्रवासाच्या वेळात मोठी बचत होईल : सध्या रॉडबीहावन (डेन्मार्क) ते पुटगार्टन (जर्मनी) दरम्यान फेरीने जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात; बोगद्यामुळे हे अंतर कारने 10 मिनिटांत आणि ट्रेनने 7 मिनिटांत पार करता येईल. कोपनहेगन ते हॅम्बुर्ग हा 5 तासांचा रेल्वे प्रवास अडीच तासांवर येईल.
पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय
फेमर्न कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्रिक विन्सेंटसेन यांच्या मते, हा प्रकल्प केवळ दोन देशांना जोडणारा नाही, तर कार्बन उत्सर्जन कमी करणारा ‘ग्रीन’ पर्याय आहे. 160 कि.मी.चा वळसा कमी झाल्यामुळे इंधनाची बचत होईल आणि विमान प्रवासाची गरज कमी होईल. सुरुवातीला येथे पूल बांधण्याचा विचार झाला होता; पण बाल्टिक समुद्रातील वेगवान वारे आणि मोठ्या जहाजांच्या धडकेची भीती लक्षात घेता, समुद्राखालील बोगद्याचा निर्णय घेण्यात आला. येथील समुद्राचा तळ मऊ मातीचा असल्याने बोरिंग मशिनने खोदकाम करणे कठीण होते, म्हणून ‘इमर्स्ड टनेल’ (Immersed Tunnel) हे प्रगत तंत्रज्ञान वापरले जात आहे.
अतिशय सूक्ष्म काम
बोगद्याचे हे अवाढव्य भाग समुद्रात 40 मीटर खोलीवर सोडले जातात. जीपीएस (GPS) आणि अंडरवॉटर कॅमेर्यांच्या मदतीने ते 15 मिलिमीटरच्या अचूकतेने एकमेकांना जोडले जातात. ‘आम्हाला अतिशय सावधगिरी बाळगावी लागते,’ असे बांधकाम व्यवस्थापक अँडर्स गर्ट वेडे यांनी सांगितले. हा प्रकल्प युरोपियन युनियनच्या वाहतूक जाळे मजबूत करण्याच्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि यामुळे भविष्यात संपूर्ण युरोपमधील व्यापार आणि पर्यटनाला नवी गती मिळेल.
प्रमुख वैशिष्ट्ये :
लांबी : 18 किलोमीटर (11 मैल).
खर्च : सुमारे 7.4 अब्ज युरो (अंदाजे 67,000 कोटी रुपये).
रचना : एका भागात पाच स्वतंत्र नळ्या (र्ढीलशी) असतील- दोन रेल्वेसाठी, दोन चौपदरी रस्त्यासाठी आणि एक आपत्कालीन मार्गासाठी.
वजन : बोगद्याचा एक भाग तब्बल 73,000 टन वजनाचा आहे.