World Largest Underwater City | जगातील सर्वात मोठ्या पाण्याखालील शहरावर धोका  
विश्वसंचार

World Largest Underwater City | जगातील सर्वात मोठ्या पाण्याखालील शहरावर धोका

२२०० वर्षांपासून पाण्यात लपले आहे रोमन श्रीमंतांचे ‘लास वेगास’

पुढारी वृत्तसेवा

रोम : अमेरिकेच्या लास वेगासला आज जगातील ‘सिन सिटी’ (पापाचे शहर) म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या शहरात चोवीस तास चालणाऱ्या करमणुकीच्या गोष्टी, ज्या क्वचितच इतरत्र कुठे पाहायला मिळतात. परंतु, आजपासून जवळपास २२२० वर्षांपूर्वी रोमनांनी असेच एक शहर वसवले होते, जिथे रोमचे श्रीमंत आणि प्रभावशाली लोक आपले विविध शौक पूर्ण करण्यासाठी जात असत. या शहराला रोमन श्रीमंतांचे लॉस वेगास म्हटले जायचे. नेपल्सच्या पश्चिमेस असलेल्या या शहराचे नाव ‘बाइया’ (Baia) असे होते, जे आज समुद्रात विलीन झाले आहे. आता पाण्याखालील या जगातील सर्वात मोठ्या शहराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ‘बाइया’ हे रोमच्या श्रीमंतांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले होते. सिसरो, प्लिनी, निरो आणि ज्युलियस सिझर यांसारख्या रोमच्या प्रसिद्ध व्यक्ती येथे सुट्टी घालवण्यासाठी येत असत. हे त्या काळातील एक प्रसिद्ध ‘रिसॉर्ट शहर’ होते. असेही म्हटले जाते की, ज्युलियस सिझरच्या हत्याकांडानंतर त्याची प्रेमिका आणि इजिप्तची सुंदर राणी क्लिओपात्रा याच शहरातून पळून आपल्या देशात परतली होती. आज बाइयाचा बहुतांश भाग समुद्राखाली बुडाला आहे. १९४० च्या दशकात हवाई छायाचित्रणातून पहिल्यांदा समोर आले की, समुद्राच्या पृष्ठभागाखाली काहीतरी संरचना अस्तित्वात आहे. त्यानंतर पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या जागेचा शोध घेतला असता, त्यांना समुद्राखाली एक संपूर्ण बुडालेले शहर आढळले.

आज हे ठिकाण जगातील सर्वात मोठे अंडरवाटर म्युझियम (पाण्याखालील संग्रहालय) आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना येथे मोठ्या प्रमाणावर प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक येथे पाण्याखालील ऐतिहासिक अवशेष पाहण्यासाठी येतात, परंतु या ऐतिहासिक ठिकाणावर आता मोठे संकट मंडावत आहे. या परिसरातील ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय होत आहे, ज्यामुळे पर्यटकांसाठी हा परिसर बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ‘बाइया’ हे ‘फ्लेग्रेयन फील्डस्‌’ नावाच्या ठिकाणी वसलेले आहे, जे एका सुपर व्होल्कॅनोचा (महा-ज्वालामुखी) भाग आणि एक विशाल काल्डेरा आहे. या भागात अनेक लहान-लहान ज्वालामुखी वेंट (छिद्र) तयार झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT