अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबी शहराच्या आग्नेयेस जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे. अबुधाबीच्या स्वेहान येथे असलेल्या या प्रकल्पाचे नाव नूर अबुधाबी असे आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ 'प्रकाश' असा होतो. त्यामध्ये सुमारे 40 लाख सोलर पॅनेल्स बसवलेले असून, त्यांच्या माध्यमातून निर्माण केलेली वीज सुमारे दोन लाख घरांना प्रकाशित करते.
या योजनेची सुरुवात मे 2017 मध्ये करण्यात आली होती. तिचे व्यावसायिक कार्य एप्रिल 2019 मध्ये सुरू झाले. नूर अबुधाबी प्रकल्प हा अबुधाबी सरकार आणि जपानच्या मारुबेनी कार्प तसेच चीनच्या सोलर होल्डिंगचा संयुक्त प्रकल्प आहे. अशा प्रकारे अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या रोसमोंडमध्ये सोलर स्टार पॉवर प्लान्टची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली होती.
अमेरिकेतील हा सर्वात मोठा सौर प्रकल्प 13 किलोमीटर क्षेत्रात फैलावलेला आहे. त्यामध्ये 1.7 दशलक्ष पॅनेल्स लावलेले आहेत. त्यामधून 579 मेगावॅट वीज निर्माण केली जाते. जगभरात सध्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांना उत्तेजन दिले जात आहे. त्यामध्ये सौरऊर्जेला महत्त्व आहे. अबुधाबीपासून 35 किलोमीटर अंतरावर वाळवंटाच्या एका भागाचे रूपांतर अशा सिंगल-साईट सोलर पॉवर प्लान्टमध्ये केलेले आहे.