World Largest Shivling | बिहारमध्ये स्थापित होणार जगातील सर्वात मोठे शिवलिंग Pudhari File Photo
विश्वसंचार

World Largest Shivling | बिहारमध्ये स्थापित होणार जगातील सर्वात मोठे शिवलिंग

अरुण पाटील

पाटणा : बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात निर्माणाधीन असलेल्या ‘विराट रामायण मंदिरा’त जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची स्थापना करून बिहार एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. एकाच अखंड काळ्या ग्रॅनाईट पाषाणातून कोरलेले हे शिवलिंग 33 फूट उंच असून त्याचे वजन तब्बल 210 टन आहे.

हे महाकाय शिवलिंग तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे साकारण्यात आले आहे. तिथून बिहारपर्यंतचा सुमारे 2500 किलोमीटरचा प्रवास या शिवलिंगाने 45 दिवसांत पूर्ण केला. इतक्या वजनी वास्तूची वाहतूक करण्यासाठी खास डिझाईन केलेल्या ‘मल्टी-एक्सल’ वाहनाचा वापर करण्यात आला. हा प्रवास तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून जात गोपालगंजमार्गे पूर्व चंपारणमध्ये पोहोचला. येत्या 17 जानेवारी रोजी पूर्ण वैदिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या घोषात या शिवलिंगाची स्थापना केली जाईल.

या सोहळ्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी ः पाच प्रमुख तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या पवित्र जलाने शिवलिंगाला अभिषेक केला जाईल. या मंगलप्रसंगी आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. मंदिराच्या अधिकार्‍यांनुसार, या दिवशी महाशिवरात्रीसारखाच एक दुर्मीळ ग्रहांचा योग जुळून येत आहे, ज्याला आध्यात्मिक द़ृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. सुमारे 120 एकर परिसरात पसरलेले हे विराट रामायण मंदिर हिंदू संस्कृतीचे एक मोठे आध्यात्मिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. महावीर मंदिर ट्रस्टचे दिवंगत आचार्य किशोर कुणाल यांनी या भव्य मंदिराची संकल्पना मांडली होती. एकाच दगडातून घडवलेले आणि 33 फूट उंची असलेले हे जगातील अशा प्रकारचे पहिलेच सर्वात मोठे शिवलिंग ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT