Giant Prehistoric Scorpion | ४१.५ कोटी वर्षांपूर्वी होता जगातील सर्वात मोठ्या विंचवाचा वावर  
विश्वसंचार

Giant Prehistoric Scorpion | ४१.५ कोटी वर्षांपूर्वी होता जगातील सर्वात मोठ्या विंचवाचा वावर

तब्बल सहा इंचांच्या होत्या शिकारीसाठीच्या नांग्या

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सुमारे ४१.५ कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वीवरील इतर भूचर प्राणी आकाराने अत्यंत लहान होते, अशा काळात जगातील सर्वात मोठ्या विंचवाचे अस्तित्व होते, असा शोध एका नवीन अभ्यासातून लागला आहे. हा महाकाय विंचू सध्याच्या ब्रिटिश भूभागावर आणि पाणथळ जागी वावरत असे.

मँचेस्टर विद्यापीठाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रागैतिहासिक जीवाला ‘प्रिआर्कटुरस गिगास’ (Praearcturus gigas) असे नाव देण्यात आले आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार या विंचवाची लांबी सुमारे ३.३ फूट (१ मीटर) होती, तर त्याची शिकार पकडण्याची नांगी तब्बल ६.२ इंच (१६ सेंटीमीटर) लांब आणि अतिशय मजबूत होती. ‘अर्ली डेव्होनियन कालखंडात’ जेव्हा जमिनीवरील सजीव सृष्टी सुरुवातीच्या टप्प्यात होती आणि तिथे लहान संधिपाद प्राण्यांचे वर्चस्व होते, तेव्हा हा विंचू तिथल्या पूरग्रस्त मैदानी प्रदेशातील एक भयानक ‘अपेक्स प्रेडेटर’ (अन्ना साखळीतील सर्वोच्च शिकारी) असावा.

संधिपाद हा सध्या पृथ्वीवरील प्राण्यांचा सर्वात मोठा आणि वैविध्यपूर्ण समूह आहे, ज्यामध्ये कीटक, खेकडे/कोळंबी, विंचू आणि कोळी यांचा समावेश होतो. पृथ्वीवर जंगलांसारख्या गुंतागुंतीच्या परिसंस्थेची निर्मिती होण्याच्या खूप आधी, म्हणजेच ४१.५ कोटी वर्षांपूर्वी इतका मोठा विंचू अस्तित्वात होता, या शोधामुळे कीटकांच्या आणि इतर संधिपाद प्राण्यांच्या महाकाय आकाराच्या उत्क्रांतीच्या इतिहासावर नवीन प्रकाश पडला आहे. लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियममधील जीवाश्म सांधेपाड प्राण्यांचे क्युरेटर आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक रिचर्ड हॉवर्ड यांनी सांगितले की, ‘‘हा प्राणी विंचूच होता यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे, हे जीव इतक्या अवाढव्य आकारात कधी आणि कसे उत्क्रांत झाले, याबद्दलच्या आमच्या समजात कमालीचा बदल झाला.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT