न्यूयॉर्क : कोट्यवधी वर्षांच्या काळानंतर नैसर्गिकरित्या हिरे बनत असतात. भूगर्भात प्रचंड तापमान आणि उष्णतेमुळे कार्बनचे हे तेजस्वी रूप बनते. अत्यंत कठीण असणारे हिरे सहसा शुभ्र रूपातच आपण पाहत असतो, पण काही हिर्यांमध्ये वेगवेगळ्या रंगछटाही आढळतात. पिवळा, गुलाबी आणि चक्क काळा हिराही जगात आहे! जगातील सर्वात मोठा आणि दुर्मीळ गुलाबी हिरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘द एटर्नल पिंक’ या हिर्याने अलीकडेच जगभरातील रत्नप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. हिर्यांचा हा दुर्मीळ नमुना केवळ त्याच्या आकारामुळेच नव्हे, तर त्याच्या रंगाच्या सौंदर्यामुळेही अत्यंत अनमोल मानला जातो.
‘द एटर्नल पिंक’ हा सुंदर हिरा 10.57 कॅरेटचा आहे. त्याचा रंग फॅन्सी विविड पर्पलिश पिंक (Fancy Vivid Purplish Pink) या प्रकारातील गुलाबी छटेचा आहे. त्याच्या शुद्धतेबाबत बोलायचे तर तो इन्टर्नली फ्लॉलेस (Internally Flawless) म्हणजेच कोणतीही अंतर्गत त्रुटी नसलेला आहे. आफ्रिकेतील बोत्सवाना देशातील खाणीत हा दुर्मीळ हिरा सापडला. हा हिरा 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये सॉथबीच्या लिलावात सादर करण्यात आला होता.
या हिर्यासाठी जवळपास 35 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 288 कोटी रुपये) इतकी किंमत अपेक्षित होती. त्याचे सौंदर्य, रंग आणि शुद्धता पाहता त्याला ‘हिर्यांच्या जगातील मोनालिसा’ असे संबोधण्यात आले. गुलाबी हिरे हे प्राचीन काळापासून अत्यंत दुर्मीळ व आकर्षक मानले जातात. त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रंगाची नैसर्गिकता यामुळे ते अत्यंत उच्च किंमतीत विकले जातात. ‘द एटर्नल पिंक’ हा हिरा त्यातील सर्वोच्च दर्जाचा मानला जातो.