लंडन : जगातील सर्वात मोठा हिमखंड ‘ए 23 ए’ आता विनाश घडवण्याची शक्यता आहे. तो दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण अटलांटिकमध्ये असलेल्या आसपासच्या बेटांशी टक्कर देण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या क्षेत्राच्या अद्वितीय आणि समृद्ध जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणावर हिमखंड ‘ए 23 ए’ आदळणार आहे, त्या ठिकाणी पेंग्विन, सील आणि दुर्मीळ सागरी प्रजातींचा अधिवास आहे. जर ही टक्कर झाली तर लाखो प्राण्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
या हिमखंडाचा आकार ग्रेटर लंडनच्या दुप्पट असल्याचे सांगितले जाते. 1986 मध्ये तो फिल्चनर-रोन आईस शेल्फपासून वेगळा झाला. सुरुवातीच्या दशकांमध्ये तो समुद्राच्या तळाशी अडकला आणि हळूहळू वितळत गेला. 2020 मध्ये तो दक्षिण महासागराकडे वाटचाल करू लागला आणि 2023 मध्ये तो पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने पुन्हा आपला प्रवास सुरू केला. ‘टेलर कॉलम्स’ नावाच्या समुद्री भोवर्यांमध्ये हा हिमखंड अडकलेला आढळला. हे भोवरे समुद्राखालील टेकड्यांमुळे होतात आणि हिमखंडांना थांबवू शकतात. याच्या वजनाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. ए 23 ए चे वजन एक ट्रिलियन टनांपेक्षा जास्त होते. इतके वजन असूनही तो या भोवर्यांपासून वाचण्यात यशस्वी झाला. दक्षिण जॉर्जिया क्षेत्र हे जैवविविधतेचे समृद्ध केंद्र आहे. या बेटावर पेंग्विन आणि सील मोठ्या संख्येने राहतात. जर ए 23 ए येथे आदळला तर येथील प्राण्यांना अन्नासाठी सागरी भागात जाण्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. ‘आईसबर्ग हा मूळत: खूप धोकादायक आहेत. जर तो आदळण्यापासून चुकला तर आम्हाला खूप आनंद होईल, असे दक्षिण जॉर्जिया सरकारी जहाज फॅरोसचे कॅप्टन सायमन वॉलेस यांनी सांगितले. या भागातील वन्यजीवांना एखाद्या हिमखंडामुळे धोका निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2004 मध्ये दक्षिण जॉर्जियाजवळ ए 38 - बी नावाच्या एका हिमखंडाचा भाग समुद्रात अनेक महिने अडकून राहिला होता. ज्यामुळे पेंग्विन आणि सील त्यांच्या खाद्याच्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हते.