लंडन : एकेकाळी जगातील सर्वात मोठा असलेला आणि रोड आयलँड एवढ्या प्रचंड आकाराचा ‘ए-23 ए’ हा हिमखंड मे महिन्यापासून आतापर्यंत सुमारे 80 टक्के वितळला आहे, अशी माहिती बि—टिश अंटार्क्टिक सर्व्हे (BAS) च्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.
‘बीएएस’मधील ध्रुवीय समुद्रशास्त्रज्ञ अँर्ड्यू मेइजर्स यांनी ‘सीएनएन’ (CNN) वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘ए-23 ए’ नावाचा हा ‘मेगाबर्ग’ दक्षिण अटलांटिक महासागरातील साऊथ जॉर्जिया बेटाभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणार्या प्रवाहामध्ये अडकल्यानंतर वेगाने वितळत आहे. 1986 मध्ये हा प्रचंड हिमखंड अंटार्क्टिकाच्या फिल्चनर-रोने हिमनदीच्या थरातून वेगळा झाला होता. त्यानंतर लगेच तो वेड्डेल समुद्रातील समुद्राच्या तळाशी अडकून 30 वर्षांहून अधिक काळ तिथेच राहिला.
त्याला जगातील सर्वात मोठा हिमखंड म्हणून ओळख मिळाली. या काळात 2019 ते 2020 मध्ये ‘ए-68’ आणि 2021 मध्ये ‘ए-76’ सारख्या इतर काही हिमखंडांनी त्याला तात्पुरते मागे टाकले होते. 2020 मध्ये समुद्राच्या तळाला जोडलेला बर्फ वितळल्यामुळे ‘ए-23 ए’ पुन्हा हलण्यास सुरुवात झाली. पण लवकरच तो पुन्हा एका पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या ‘टेलर कॉलम’मध्ये अडकला. त्यानंतर तो डिसेंबर 2024 मध्ये बाहेर पडला आणि जानेवारीमध्ये तो साऊथ जॉर्जिया बेटाकडे वेगाने सरकत असल्याचे वृत्त आले होते.
जानेवारीमध्ये, ‘ए-23 ए’चे वजन सुमारे 1.1 ट्रिलियन टन होते आणि त्याचे क्षेत्रफळ 1,418 चौरस मैल (3,672 चौ.किमी.) होते, असे ‘सीएनएन’ने सांगितले. आता हा ‘मेगाबर्ग’ फारसा ‘मेगा’ राहिलेला नाही. त्याचे क्षेत्रफळ 656 चौरस मैल (1,700 चौ.किमी.) इतके झाले आहे. म्हणजेच अवघ्या आठ महिन्यांत तो त्याच्या मूळ आकाराच्या सुमारे एक पंचमांश इतकाच शिल्लक राहिला आहे.