व्हिएतनाममधील जगातील सर्वात मोठी गुहा Pudhari File Photo
विश्वसंचार

व्हिएतनाममधील जगातील सर्वात मोठी गुहा

गुहेच्या आतही दाट वनस्पतींनी भरलेले एक प्राचीन जंगल विकसित

पुढारी वृत्तसेवा

हनोई : जगातील सर्वात मोठी ज्ञात नैसर्गिक गुहा व्हिएतनाममध्ये आहे. या हँग सॉन डूंग नावाच्या गुहेमध्ये एवढी मोठी जागा आहे की, त्याच्या काही भागातून ‘बोईंग 747’ सहज उडू शकते. ही अप्रतिम चुनखडीची गुहा व्हिएतनामच्या फोंग न्हा-के बांग नॅशनल पार्कच्या दाट जंगलाखाली स्थित आहे. गुहेतील विशाल नैसर्गिक छिद्रांमुळे (स्कायलाईट्स) सूर्यप्रकाश आत येतो. त्यामुळे गुहेच्या आतही दाट वनस्पतींनी भरलेले एक प्राचीन जंगल विकसित झाले आहे.

‘सॉन डूंग’ या नावाचा अर्थ ‘माऊंटन रिव्हर’ (पर्वतीय नदी) असा होतो. ही गुहा इतर चुनखडीच्या गुहांच्या तुलनेने तुलनेने कमी वयाची आहे. ती सुमारे 20 ते 30 लाख वर्षांपूर्वी तयार झाली. आशियातील सर्वात मोठ्या चुनखडीच्या खडकांपैकी एका 40 कोटी वर्षे जुन्या खडकाच्या आत दोन नद्या राव थुओंग आणि खे री या वाहू लागल्या आणि त्यांनी खडक पोखरून ही भव्य गुहा निर्माण केली. ही गुहा 1990 मध्ये हो खांह नावाच्या स्थानिक शिकार्‍याने अपघाताने शोधली. ‘माझ्या अंगावर अचानक जोरदार वारा आला आणि आतून वाहणार्‍या नदीचा आवाज ऐकू आला,’ असे त्यांनी सांगितले. मात्र, जंगली वनराईमुळे त्यांना परत ती जागा सापडली नाही. 2009 मध्ये ब्रिटिश केव्ह रिसर्च असोसिएशनच्या एका संशोधन मोहिमेदरम्यान हो खांह यांनी गुहेचा मार्ग पुन्हा शोधला आणि ब्रिटिश संशोधक हावर्ड लिम्बर्ट यांच्या नेतृत्वाखालील चमूला तेथे नेले. ‘आम्हाला त्वरित जाणवले की, ही गुहा अतिशय मोठी आहे,’ असे लिम्बर्ट यांनी सांगितले. संशोधकांनी 1.35 अब्ज घनफूट (38.5 दशलक्ष घनमीटर) इतकी मोठी गुहा असल्याचे मोजमाप केले. म्हणजेच, यात सुमारे 15 ग्रेट पिरॅमिडस् ऑफ गिझा सहज मावू शकतात. 2019 मध्ये झालेल्या एका डायव्हिंग मोहिमेदरम्यान संशोधकांना सॉन डूंग ही हँग थुंग नावाच्या दुसर्‍या गुहेसह जोडलेली असल्याचे आढळून आले. या जोडणीमुळे गुहेच्या एकूण आकारात 5.7 कोटी घनफूट (1.6 दशलक्ष घनमीटर) इतकी वाढ झाली, जी सुमारे 2/3 ग्रेट पिरॅमिड इतकी आहे. ‘ही तुलना अशी आहे की, जणू एव्हरेस्ट पर्वतावर एक मोठा भूभाग सापडला आणि त्याची उंची आणखी 1000 मीटरने वाढली,’ असे लिम्बर्ट यांनी सांगितले. या भव्य गुहेच्या संपूर्ण संरचनेचा शोध अद्यापही सुरू आहे. हँग सॉन डूंग केवळ एका नैसर्गिक आश्चर्यापेक्षा अधिक असून, पृथ्वीवरील भूगर्भशास्त्रीय इतिहास आणि जैवविविधतेच्या अभ्यासासाठी एक अनमोल ठेवा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT