वॉशिंग्टन : ‘कॅरोलिना रिपर’ ही जगातील सर्वाधिक तिखट मिरची म्हणून ओळखली जाते. ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्’नुसार तिचा तिखटपणा सरासरी 15 ते 22 लाख स्कोव्हिल हीट युनिटस् (SHU) इतका आहे. काही मिरच्या तर 23 लाख SHU पेक्षाही अधिक तिखट नोंदवण्यात आल्या आहेत.
ही मिरची अमेरिकेतील साउथ कॅरोलिनामधील कृषी तज्ज्ञ एड करी यांनी विकसित केली. लाल रंगाची, टोकाला विंचूसारखी शेपटी असलेली ही मिरची दिसायलाही आगळीवेगळी आहे. अत्यंत तिखट असतानाही तिच्यात किंचित गोडसर आणि फळांसारखी चव असल्याचे सांगितले जाते. कॅरोलिना रिपरमध्ये कॅप्सेसिन या घटकाचे प्रमाण अतिशय जास्त असते. हाच घटक तिखटपणा निर्माण करतो. जास्त प्रमाणातील कॅप्सेसिनमुळे जिभेवर तीव्र जळजळ, डोळ्यांत पाणी, घाम येणे आणि काही वेळा श्वसनास त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, अत्यल्प प्रमाणात घेतल्यास कॅप्सेसिनमुळे वेदनाशामक परिणाम, चयापचय वाढणे आणि अँटिऑक्सिडंट फायदे होऊ शकतात. मात्र कॅरोलिना रिपरसारखी अतितिखट मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी, उलटी, रक्तदाबात बदल किंवा गंभीर अस्वस्थता निर्माण होण्याचा धोका असतो. या मिरचीचा वापर सॉस, चटण्या किंवा तिखट पदार्थांत अत्यंत मर्यादित प्रमाणात केला जातो. स्वयंपाक करताना हातमोजे वापरणे, डोळे किंवा चेहर्याला हात न लावणे आणि लहान मुलांपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अत्यंत तिखट पदार्थ आवडणार्या लोकांमध्ये कॅरोलिना रिपरला विशेष मागणी आहे. जगभरात ‘स्पायसी चॅलेंजेस’, सॉस उद्योग आणि खाद्यसंस्कृतीत या मिरचीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिखटपणाचा कडेलोट गाठलेली कॅरोलिना रिपर ही केवळ मिरची नसून ती मानवी सहनशक्तीचीही एक कसोटी ठरते.