जगातील पहिला लाकडी सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेत Pudhari File Photo
विश्वसंचार

जगातील पहिला लाकडी सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेत

अंतराळ कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी लाकडी सॅटेलाईट बनवण्याचा प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : जगातील पहिला लाकडी सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह अखेर पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत झाला आहे. या सॅटेलाईटचे नाव ‘लिग्नोसॅट’ असे आहे. एखाद्या कॉफी मगइतक्या आकाराचा हा सॅटेलाईट मॅग्नोलिया लाकडापासून बनवण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये तो पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून सोडण्यात आला होता. त्याबाबतची घोषणा नुकतीच ‘नासा’ने केली आहे. हे सॅटेलाईट जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी ‘जाक्सा’ने विकसित केलेले आहे. त्याला अंतराळात अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सोडले. स्पेसफ्लाईटस् अधिक किफायतशीर बनवण्याच्या उद्देशाने तसेच अंतराळ कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी असा लाकडी सॅटेलाईट बनवण्याचा हा प्रयोग केला आहे.

अंतराळाच्या पोकळी लाकूड जळत नाही किंवा खराबही होत नाही. मात्र ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्याची जळून राख होते. त्यामुळे भविष्यातील बायोडिग्रेडेबल सॅटेलाईटस् बनवण्यासाठी हा एक चांगला उपाय ठरू शकतो. 2024 च्या प्रारंभीच त्यासाठीच्या लाकडांच्या नमुन्यांचे अंतराळ स्थानकावर परीक्षण करण्यात आले होते. त्यामधून लाकडी सॅटेलाईटसाठीचे योग्य लाकूड निवडण्यात आले. या परीक्षणासाठी तीन प्रकारचे लाकूड पाठवण्यात आले होते. ही तिन्ही प्रकारची लाकडे अंतराळात टिकून राहतात असे दिसले. तीव— कॉस्मिक रेज तसेच दर दहा महिन्यांनी येणारे धोकादायक सौरकण यांना तोंड देण्यास ती सक्षम होती. या तीन प्रकारच्या लाकडांमध्ये मॅग्नोलिया, चेरी आणि बिर्च वृक्षाची लाकडे समाविष्ट होती. त्यामधून संशोधकांनी मॅग्नोलियाची निवड करण्याचे कारण म्हणजे त्यापासून सॅटेलाईट बनवत असताना ते मोडण्याचे किंवा त्याचे तुकडे पडण्याचे प्रमाण कमी असते. सध्या पृथ्वीभोवती 9300 टनाची सामग्री फिरत आहे. त्यामध्येच अवकाशीय कचर्‍याचाही समावेश आहे. या कचर्‍यामध्ये निकामी झालेले सॅटेलाईट तसेच स्पेस रॉकेटस्चे भाग यांचा समावेश होतो.‘लिग्नोसॅट’सारखे लाकडी सॅटेलाईट हे अवकाशीय कचरा म्हणून कमी धोकादायक असतात. त्यांना पृथ्वीच्या वातावरणात आणून पूर्णपणे नष्ट करता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT