बीजिंग : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचा शेजारी देश असलेल्या चीनने एक मोठी कामगिरी केली आहे. जगात पहिल्यांदाच एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये मानवी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून रोबो तैनात करण्यात आले आहेत. हे रोबो आता फॅक्टरी वर्कर म्हणून काम करत असून, ते 24 तास न थांबता काम करण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
चिनी कंपनी ‘ AGIBOT’ ने एका इलेक्ट्रॉनिक फॅक्टरीमध्ये हे रोबो तैनात केले आहेत. हे रोबो सध्या टॅबलेट निर्मितीमध्ये मदत करत आहेत. ‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग’च्या अहवालानुसार, या रोबोंना फॅक्टरीच्या प्रोडक्शन लाईनमध्ये स्थापित करण्यासाठी केवळ 36 तासांचा वेळ लागला. विशेष म्हणजे, या रोबोंचा ‘सक्सेस रेट’ 99.9 टक्के आहे, ज्याचा अर्थ असा की त्यांच्या कामात चुकीला वाव नाही. हे रोबो AGIBOT कंपनीचे असून, त्यांनी ‘ G2 ह्युमनॉईड रोबो’ मॉडेल फॅक्टरीमध्ये उतरवले आहे. ‘लाँगचीअर टेक्नॉलॉजी’च्या टॅबलेट सुविधेत हे रोबो काम करत आहेत. या रोबोंना टॅबलेट टेस्टिंग लाईनवर नेमण्यात आले आहे. चालत्या बेल्टवरून टॅबलेट उचलणे आणि टेस्टिंग मशिनमध्ये ते अचूकपणे फिट करणे ही त्यांची जबाबदारी आहे.
टॅबलेट चांगला आहे की खराब, हे तपासून ते वेगवेगळ्या विभागांत ठेवण्याचे कामही हे रोबो करत आहेत. या रोबोंची कार्यक्षमता थक्क करणारी आहे. ते एका तासाला 310 टॅबलेटची गुणवत्ता तपासू शकतात. प्रत्येक 20 सेकंदात एका टॅबलेटची तपासणी पूर्ण होते. हे रोबो एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) मुळे स्वतःला नवीन कामांनुसार जुळवून घेतात. जर फॅक्टरीमध्ये नवीन मॉडेलचा टॅबलेट आला, तरीही हे रोबो त्याला कोणत्याही अतिरिक्त प्रोग्रामिंगशिवाय तपासू शकतात. अहवालानुसार, 2026 हे वर्ष कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोबो तैनात करण्याचे महत्त्वपूर्ण वर्ष ठरू शकते. सध्या टॅबलेट निर्मितीमध्ये वापरले जाणारे हे रोबो लवकरच कार निर्मिती कंपन्यांच्या प्रोडक्शन लाईनमध्येही दिसतील.