कार्डिफ : आज जगात रेल्वे आणि स्थानके (स्टेशन्स) सर्वत्र आहेत, पण या सर्वांची सुरुवात वेल्समधील एका छोट्याशा समुद्रकिनार्यावरील रेल्वेतून झाली, हे फार कमी लोकांना माहीत आहे. 1807 साली, जेव्हा एका घोड्यांनी ओढलेल्या डब्याने वेल्समधील एका ट्रामवेवरून प्रवास सुरू केला, तेव्हा तो एक ऐतिहासिक क्षण होता.
ही जगातील पहिली प्रवासी रेल्वे सेवा होती, जिने स्वान्सी टू ऑइस्टरमाऊथ (मंबल्स) या मार्गावर स्वन्सी खाडीच्या बाजूने 5 मैलांचा प्रवास केला. ही जगातील पहिली तिकीट आकारणारी प्रवासी रेल्वे म्हणून नोंदली गेली. ‘द माऊंट’ हे ठिकाण जगातील पहिले नोंदलेले रेल्वे स्थानक मानले जाते, तेथे ना तिकीट खिडकी होती ना बाक . प्रवासी थेट रुळांलगतच्या टेकाडावरून गाडीत चढत असत.गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही याला मान्यता दिली आहे.
या मार्गावर 1877 मध्ये पहिल्यांदा वाफेवर चालणार्या इंजिनची चाचणी झाली, तर 1898 मध्ये मंबल्स पिअरपर्यंत विस्तार झाल्यानंतर 1929 मध्ये लाल रंगाच्या ट्राम दाखल झाल्या. त्या काळात प्रवासाचा कालावधी फक्त 19 मिनिटांवर आला. 1940 च्या दशकात या रेल्वेने वार्षिक जवळपास पन्नास लाख प्रवाशांना सेवा दिली. मोठे डबल-डेकर ट्राम 106 प्रवासी बसवू शकत आणि दिवसाच्या सहलींसाठी ही रेल्वे विशेष लोकप्रिय ठरली. 5 जानेवारी 1960 रोजी या रेल्वेची अंतिम फेरी पार पडली. हजारो लोकांनी रेल्वेला अखेरचा निरोप दिला. आज त्या जागी फक्त गवताळ भाग दिसतो, पण इतिहासतज्ज्ञांच्या मते, जगातील आधुनिक रेल्वेची खरी सुरुवात या ठिकाणी म्हणजेच वेल्समध्ये झाली होती.
रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे
1804 : वेल्समध्येच, रिचर्ड ट्रेविथिक यांनी पहिल्यांदा वाफेच्या इंजिनने रेल्वेगाडी चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला.
1807 : ‘ऑयस्टरमाऊथ रेल्वे’ ने प्रवाशांसाठी तिकीट घेऊन सेवा सुरू केली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्नेही याला जगातील पहिली प्रवासी रेल्वे म्हणून मान्यता दिली आहे.
1825 : स्टॉकटन ते डार्लिंग्टन ही सार्वजनिक रेल्वे वाफेच्या इंजिनवर चालणारी जगातील पहिली रेल्वे म्हणून प्रसिद्ध झाली, पण स्वन्सीमधील रेल्वे त्यापूर्वीच 18 वर्षे सुरू झाली होती.
‘द माऊंट’ : जगातील पहिले रेल्वे स्टेशन
सुरुवातीला स्वान्सी टू ऑइस्टरमाऊथ (मंबल्स) मार्गावरील ही रेल्वे दिवसातून तीन वेळा घोड्यांनी ओढली जाई आणि स्वन्सीमधील ‘द माऊंट’ येथून ‘ऑयस्टरमाऊथ’ गावापर्यंत जाई. ‘द माऊंट’ हे जगातील पहिले रेल्वे स्टेशन होते, पण तिथे ना तिकीट काऊंटर होता ना प्लॅटफॉर्म. प्रवाशांना एका मातीच्या ढिगार्यावरून डब्यावर चढावे लागे.