म्युनिक (जर्मनी) : हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेत जगण्याचे स्वप्न पाहणार्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. जगातील पहिले संपूर्णपणे हॅरी पॉटर थीमवर आधारित हॉटेल लवकरच युरोपमध्ये सुरू होणार आहे. जर्मनीच्या ‘गुनजबर्ग’ शहरातील ‘लेगोलँड डॉयचलँड रिसॉर्ट’मध्ये हे हॉटेल उभारले जात आहे. हे हॉटेल म्युनिक आणि स्टटगार्ट शहरांच्या मध्यभागी स्थित आहे. वृत्तानुसार, या हॉटेलमधील प्रत्येक खोलीला हॅरी पॉटरच्या विश्वाची झलक देण्यासाठी विशेष डिझाईन करण्यात आले आहे. खोल्यांना हॉगवर्टस्मधील चारही ‘हाऊस’च्या रंगात सजवले जाईल आणि बेडचे डिझाईन ‘रॉन विझली’च्या बेडपासून प्रेरित असेल. हॉटेलचा प्रत्येक कोना विझार्डिंग वर्ल्डच्या जादूमय वातावरणाने भरलेला असेल.
आतापर्यंत हॅरी पॉटरचे मोठे थीम पार्क आणि विशेष अनुभव प्रामुख्याने अमेरिकेत पाहायला मिळत होते. मात्र, हे हॉटेल सुरू झाल्यामुळे युरोपीय चाहत्यांना जादुई अनुभवासाठी आता अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेला जाण्याची गरज भासणार नाही. या हॉटेलच्या अधिकृत उद्घाटनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, तरीही सोशल मीडियावर याच्या फोटोंनी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. जोपर्यंत हे नवीन हॉटेल पूर्ण होत नाही, तोपर्यंत चाहते जगभरातील इतर काही खास ठिकाणांना भेट देऊ शकतात :
ग्राऊंड कीपर कॉटेज (इंग्लंड) : दगडांनी बनलेले हे कॉटेज हॅग्रिडच्या घराची आठवण करून देते.
जॉर्जियन हाऊस हॉटेल (लंडन) : हे हॉटेल त्याच्या गॉथिक बेड आणि ‘डार्क आर्टस्’ क्लासरूमसारख्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
द बाल्मोरल हॉटेल (स्कॉटलंड) : येथील ‘जे. के. रोलिंग स्वीट’ ऐतिहासिक आहे. कारण, याच ठिकाणी लेखिकेने ‘हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज’ हे पुस्तक पूर्ण केले होते. जर्मनीतील हे नवीन हॉटेल युरोपमधील पर्यटनाचा एक मोठा केंद्रबिंदू ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चाहत्यांसाठी ही केवळ एक निवासाची जागा नसून, त्यांच्या स्वप्नातील जादुई जगात काही दिवस व्यतीत करण्याची मोठी संधी असेल.