शिकागो: नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या अभियंत्यांनी रोबोटिक्सच्या जगात एक नवा चमत्कार घडवला आहे. त्यांनी ‘लेग्ड मेटा मशिन्स’ नावाचे असे मॉड्यूलर रोबो विकसित केले आहेत, जे केवळ खेळाडूंसारखे चपळच नाहीत, तर ते स्वतःला हव्या त्या आकारात जोडू शकतात. हे रोबो गंभीर दुखापत किंवा तुकडे झाल्यावरही न थांबता पुन्हा कामाला लागण्याची क्षमता ठेवतात. या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. हे रोबो एखाद्या ‘लेगो’ सेटसारख्या स्वतंत्र तुकड्यांपासून (मॉड्यूल) बनलेले आहेत. प्रत्येक मॉड्यूलमध्ये स्वतःची बॅटरी, मोटर आणि संगणक (मेंदू) आहे. एकटा तुकडा स्वतःहून लोळू शकतो, उडी मारू शकतो किंवा वळू शकतो.
जेव्हा हे तुकडे एकमेकांना जोडले जातात, तेव्हा त्यांची खरी ताकद आणि चपळता दिसून येते. हे रोबो सील माशाप्रमाणे पोहू शकतात, सरड्यासारखे धावू शकतात किंवा कांगारूसारखी उडी मारू शकतात. हे रोबो बनवण्यासाठी अभियंत्यांनी पारंपरिक मानवी किंवा प्राण्यांच्या आकाराची नक्कल केली नाही. त्याऐवजी, त्यांनी ‘एआय’ चा वापर करून नवीन ‘प्रजाती’ विकसित केल्या. ‘एआय’ने अशा विचित्र शरीररचना तयार केल्या ज्यांचा विचार मानवी मेंदू करू शकला नसता. हे रोबो उलटे पडल्यास स्वतःहून सरळ होतात, अडथळ्यांवरून उड्या मारतात आणि हवेत गिरक्या घेण्यासारखी कसरतीची कामेही करतात. या संशोधनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक सॅम क्रिगमन म्हणतात, ‘हे रोबो संगणकामध्ये उत्क्रांत होऊन प्रत्यक्षात बाहेर आलेले पहिले रोबो आहेत.
जर या रोबोचे दोन तुकडे केले, तर ते मरत नाहीत. प्रत्येक तुकडा एक स्वतंत्र घटक बनून पुन्हा चालायला लागतो आणि आपल्या टीमला जाऊन मिळतो. इतर कोणत्याही रोबोसाठी जीवघेणी ठरणारी दुखापत हे रोबो सहज पचवू शकतात.‘आजचे बहुतेक रोबो हे ठराविक कामासाठी आणि ठराविक आकाराचे असतात. जर एखादा रोबोटिक कुत्रा पाय तुटल्यामुळे निकामी झाला, तर तो कचरा बनतो. मात्र, ‘मेटा मशिन्स’ या मर्यादा ओलांडतात. हे तंत्रज्ञान रोबोटस्ना केवळ ‘साधन’ न ठेवता, त्यांना परिस्थितीनुसार बदलणार्या ‘सजीवांसारखे’ रूप देते. नॉर्थवेस्टर्नच्या मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधील चेन यू, डेव्हिड मॅथ्यूज आणि जिंगक्सियन वांग अशा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी या अभ्यासात मोलाचे योगदान दिले आहे. या शोधामुळे भविष्यात आपत्ती निवारण आणि अंतराळ मोहिमांमध्ये अत्यंत लवचिक रोबोटस्चा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.