वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने आता हवेतील उड्डाण कौशल्यातही मानवाला मागे टाकले आहे. जगातील सर्वोत्तम मानवी ड्रोन वैमानिकांपेक्षाही (Drone Pilots) अधिक वेगाने चॅम्पियनशिप रेस ट्रॅक पार करून एका एआय-सक्षम ड्रोनने नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
‘सायन्स रोबोटिक्स’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी एक प्रगत एआय प्रणाली विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर एका ‘क्वाडकॉफ्टर’ने (चार प्रोपेलर असलेले ड्रोन) ताशी १०० किलोमीटरहून अधिक (६० मैल प्रतितास) वेगाने अत्यंत आव्हानात्मक ट्रॅक पूर्ण केला. विशेष म्हणजे, यासाठी केवळ एकच कॅमेरा, इनर्शियल मेजरमेंट युनिट आणि एका छोट्या ऑनबोर्ड कॉम्प्युटरचा वापर करण्यात आला. या प्रणालीचे नाव ‘मोनोरेस’ असे ठेवण्यात आले आहे.
या एआय ड्रोनने ‘२०२५ अबुधाबी ऑटोनॉमस रेसिंग लीग’मध्ये भाग घेत सर्व प्रतिस्पर्धी स्वायत्त संघांना नमवून विजेतेपद पटकावले. केवळ इतर रोबोट्सच नव्हे, तर जगातील तीन माजी मानवी चॅम्पियन वैमानिकांपेक्षाही कमी वेळेत ट्रॅक पूर्ण करून या प्रणालीने सर्वांना चकित केले. नेदरलँड्समधील ‘डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’च्या मायक्रो एअर व्हेईकल्स लॅबमधील संशोधकांनी ही ऑनबोर्ड ऑटोनॉमस प्रणाली विकसित केली आहे. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याने कोणत्याही जीपीएस (GPS), बाह्य मोशन-कॅप्चर सिस्टीम, स्टिरिओ कॅमेरा किंवा ट्रॅकच्या आधीच लोड केलेल्या नकाशाशिवाय ही कामगिरी केली. याच्या नावातच याची रचना स्पष्ट होते; ‘मोनो’ म्हणजे ‘मोनोक्युलर व्हिजन’ (एकेरी दृष्टी).
हा ड्रोन केवळ एका रोलिंग शटर कॅमेऱ्याच्या आधारे पाहतो, तर त्याच्या आतील ‘इनर्शियल मेजरमेंट युनिट’ (IMU) द्वारे स्वतःचा वेग, प्रवेग आणि रोटेशन मोजतो. कॅमेऱ्यातून मिळणारा मर्यादित डेटा थेट एका न्यूरल नेटवर्कला (मशिन-लर्निंग मॉडेल) पुरवला जातो. हे न्यूरल नेटवर्क रेसिंग ट्रॅकवरील गेटस् (दरवाजे) ओळखते आणि ड्रोनची अचूक स्थिती व हालचाल ओळखून पुढील दिशा ठरवते. त्यानंतर, ड्रोनच्या फ्लाइट कंट्रोलरच्या माध्यमातून प्रतिसेकंद तब्बल ५०० वेळा चारही प्रोपेलर्सना स्वयंचलित आज्ञा (Commands) पाठवून हा ड्रोन हवेत विजेच्या वेगाने मार्गक्रमण करतो.