Deepest railway station | जगातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन; प्लॅटफॉर्मवर पोहोचायलाच लागतात 30 मिनिटे  
विश्वसंचार

World’s Deepest Railway Station | जगातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन; प्लॅटफॉर्मवर पोहोचायलाच लागतात 30 मिनिटे

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : रेल्वे हे जगभरातील प्रवासाचे सर्वात मोठे साधन आहे. जगात अनेक मोठी आणि गर्दीची स्थानके आपण पाहिली असतील; पण चीनने आता असा एक अभियांत्रिकी चमत्कार करून दाखवला आहे, जो पाहून जग अवाक् झाले आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘चीनच्या भिंती’खाली जगातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन उभारण्यात आले आहे. चीनच्या ऐतिहासिक भिंतीखाली तब्बल 335 फूट (102 मीटर) खोलीवर हे स्टेशन बांधण्यात आले आहे. या स्थानकाचे नाव ‘बदलिंग ग्रेट वॉल स्टेशन’ असे आहे. हे स्टेशन इतके खोल आहे की, प्रवाशांना स्टेशनच्या प्रवेशद्वारापासून मुख्य प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ लागतो.

स्टेशनची काही खास वैशिष्ट्ये : वेळेचे कडक नियोजन : गर्दी टाळण्यासाठी, शेवटची ट्रेन सुटण्याच्या 12 मिनिटे आधीच स्टेशनचे दरवाजे बंद केले जातात. विशाल बांधकाम : हे स्टेशन 36,000 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेले असून, ते जमिनीखाली तीन मजली आहे. हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी : या स्टेशनमुळे बीजिंग ते झांगजियाकौ दरम्यानचा दीड तासाचा प्रवास आता केवळ 27 मिनिटांवर आला आहे. निर्मिती काळ : 2019 मध्ये या स्टेशनचे काम सुरू झाले आणि साधारण 4 वर्षांच्या मेहनतीनंतर 2022 मध्ये ते पूर्ण झाले.

बीजिंगपासून 80 कि.मी. अंतरावर असलेल्या बदलिंगमध्ये हे स्टेशन आहे. चीनची भिंत ही 2300 वर्षांहून अधिक जुनी असून, तिची लांबी 6300 कि.मी. आहे. या ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता, जमिनीखाली हाय-स्पीड ट्रेनसाठी 12 कि.मी. लांबीचे भुयार आणि स्टेशन तयार करणे हे चिनी अभियंत्यांसमोर मोठे आव्हान होते. चीनची भिंत बांधताना सुमारे 4 लाख मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. असे म्हटले जाते की, जे मजूर काम नीट करत नसत, त्यांना याच भिंतीत गाडले जात असे. त्याच ऐतिहासिक भिंतीच्या खाली आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे धावत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT