लंडन : दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एका जुन्या कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) फोटोने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. इंटरनेटवर पुनरागमन केलेल्या या फोटोमध्ये एक अशी 'अशक्य' गोष्ट दिसत आहे, ज्यामुळे नेटीझन्सनी थेट 'टाईम ट्रॅव्हल' (Time Travel - कालप्रवास) चे दावे करायला सुरुवात केली आहे. हा फोटो १९४३ मधील आइसलँडची राजधानी 'रेक्याविक' (Reykjavik) येथील एका गजबजलेल्या रस्त्यावरील आहे. फोटोत अमेरिकन सैनिकांच्या गर्दीत उभा असलेला एक कोट घातलेला तरुण आपल्या कानाला काहीतरी लावताना दिसत आहे. त्याची उभे राहण्याची आणि हाताची पोझ हुबेहूब आजच्या काळातील मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीसारखी आहे.
जगातील पहिला मोबाईल फोन (मोटोरोला डायना टीएसी ८०००एक्स) १९८३ मध्ये बाजारात आला, म्हणजेच हा फोटो काढला गेला त्याच्या ४० वर्षांनंतर. तरीही या फोटोतील व्यक्तीच्या हातात मोबाईलसारखीच वस्तू दिसत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. हा फोटो क्रिस्टजन हॉफमन यांच्या कुटुंबाकडे अनेक दशकांपासून होता. त्यांनी हा फोटो फेसबुकवर शेअर करताना लिहिले, "हा माणूस गर्दीत एकटाच शांत उभा आहे, त्याची टोपी आणि गळपट्टा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि तो अगदी आजच्या काळातील माणसासारखा मोबाईलवर बोलताना दिसत आहे."
या फोटोवरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. टाईम ट्रॅव्हलचे समर्थक असलेल्या अनेकांच्या मते हा भविष्यातून भूतकाळात गेलेला प्रवासी आहे. काहींच्या मते तो केवळ आपले कान खाजवत असावा किंवा त्याची घड्याळ चालू आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते कानाला लावून ऐकत असावा. काही इतिहासप्रेमींच्या मते, दुसर्या महायुद्धात आइसलँडवर मित्रराष्ट्रांचे नियंत्रण होते. हा माणूस गुप्तहेर असू शकतो आणि त्याच्या हातात काही गुप्त रेडिओ यंत्रणा असू शकते. मात्र, पोर्टेबल ट्रान्झिस्टर रेडिओचा शोधही १९५० च्या दशकात लागला होता.
यापूर्वी १९९५ मधील बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसनच्या एका मॅचचा व्हिडीओही अशाच प्रकारे व्हायरल झाला होता, ज्यात प्रेक्षकांमध्ये बसलेली एक व्यक्ती आधुनिक 'स्मार्टफोन'सारख्या उपकरणाने व्हिडीओ शूट करताना दिसत होती. मात्र, नंतर तो ९० च्या दशकातील सुरुवातीचा डिजिटल कॅमेरा असावा, असे स्पष्टीकरण देण्यात आले. सध्या या १९४३ च्या फोटोने रहस्यप्रेमींना वेड लावले असून, "त्या काळात मोबाईल टॉवर नसताना तो फोन काय उपयोगाचा?" असा थेट सवाल करत काही युजर्सनी या टाईम ट्रॅव्हलच्या थिअरीची खिल्लीही उडवली आहे.