बीजिंग : सोशल मीडियाचे जग मोठे विचित्र आहे, येथे कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आपले डोळे चोळायला मजबूर झाले आहेत. या व्हिडीओमध्ये चीनमधील एक व्यक्ती आपल्या हातांनी नूडल्स बनवताना दिसत आहे; पण हे नूडल्स साधेसुधे नाहीत. हे नूडल्स इतके पातळ आहेत की, पहिल्या नजरेत ते सुईचे टोक किंवा धाग्यासारखे वाटतात. हे काम मानवी हातांनी होऊ शकते यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये. काही युझर्स याला जादू म्हणत आहेत, तर काही जण हे कोणत्या तरी खास मशिनचे काम असावे, असे मानत आहेत.
या थक्क करणार्या व्हिडीओमागे एक मोठा जागतिक विक्रम लपलेला आहे. या व्यक्तीने हाताने बनवलेल्या ‘जगातील सर्वात पातळ नूडल्स’चा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या नूडल्सची जाडी अवघी 0.18 मिलीमीटर आहे. या कारागिराने स्वतःचाच जुना विक्रम मोडला आहे. 2010 मध्ये त्यांनी 0.33 मिमी जाडीचे नूडल्स बनवून विक्रम केला होता. आता अनेक वर्षांनंतर आपली कला अधिक प्रगत करत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नूडल्स बनवण्याची ही प्रक्रिया दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर वार्यासारखा पसरला आहे. पिठाला अत्यंत संयमाने आणि संतुलनाने ओढून केसासारख्या पातळ तारांमध्ये कसे बदलले जाते, हे पाहून जगभरातील खवय्ये चकित झाले आहेत.
काही लोक याला कष्टाचे उत्तम उदाहरण मानत आहेत, तर काही जण याला पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या कुकिंग स्किल्सचा परिणाम सांगत आहेत. हा विक्रम चर्चेत येताच भारतीय सोशल मीडिया युजर्सनीही यात उडी घेतली. या अति-पातळ नूडल्सची तुलना भारतीय पदार्थांशी होऊ लागली आहे. आपल्याकडे जुन्या जमान्यात घरोघरी महिलांकडून पाटावर अतिशय पातळ शेवया बनवल्या जात असत. अनेक युझर्सनी या नूडल्सची तुलना ‘सोहन पापडी’ किंवा राजस्थानी ‘फेणी’शी केली आहे. काही युझर्सनी मजेशीरपणे लिहिले की, ‘भारतीय स्वयंपाकघरात दररोज यापेक्षाही बारीक गोष्टी बनवल्या जातात.’