टोकियो : रेल्वे प्रवास हा सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह मानला जातो. रेल्वेने प्रवास करताना मोठी स्टेशन्स, गर्दी, प्लॅटफॉर्म, लिफ्ट आणि एस्केलेटर पाहणे ही सामान्य बाब आहे. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी स्पष्टपणे ‘एन्ट्री’ आणि ‘एक्झिट’ गेटस् असतात; पण जगात एक असे अनोखे स्टेशन आहे, जिथे ना प्रवेशद्वार आहे, ना बाहेर जाण्याचा रस्ता! ऐकायला थोडे विचित्र वाटले तरी हे सत्य आहे.
हे अनोखे रेल्वे स्टेशन सामान्य स्टेशनपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. येथे बाहेरून कोणताही प्रवासी स्टेशनवर येऊ शकत नाही आणि ट्रेनमधून उतरून कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजेच स्टेशनवर पोहोचण्याचा आणि तिथून निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘ट्रेन’ हाच आहे. प्रवासी ट्रेनमधून उतरतात, प्लॅटफॉर्मवर थोडा वेळ घालवतात आणि पुन्हा त्याच किंवा पुढच्या ट्रेनने प्रवासाला निघतात. विशेष म्हणजे येथे तिकीट काऊंटर किंवा स्टेशनची कोणतीही इमारत नाही. हे अनोखे स्टेशन भारतात नसून जपानमध्ये आहे. दक्षिण जपानमधील निशिकीगावा शिरयू लाईनवर असलेले हे स्टेशन आपल्या आगळ्यावेगळ्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. या स्टेशनचे नाव ‘शिरयू-मिहार्शी.’ येथे केवळ एकच प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे.
जपान आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो आणि हे स्टेशन त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. असे स्टेशन बांधण्यामागे एक खास उद्देश आहे. शिरयू-मिहार्शी स्टेशन हे सामान्य प्रवासासाठी नसून पर्यटनासाठी बनवले गेले आहे. हे स्टेशन ‘निशिकी’ नदीच्या अगदी वर बांधण्यात आले आहे. प्लॅटफॉर्मवरून नदी, सभोवतालचे घनदाट जंगल आणि निसर्गरम्य द़ृश्यांचा आनंद घेता येतो. ट्रेन येथे साधारणपणे 10 मिनिटे थांबते. या काळात प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात, फोटो काढतात आणि पुन्हा ट्रेनमध्ये बसतात. केवळ निसर्गाचे सौंदर्य पाहता यावे आणि प्रवाशांना काही काळ मानसिक शांतता मिळावी, याच हेतूने हे स्टेशन तयार करण्यात आले आहे. त्यामुळेच येथे बाहेर जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आलेला नाही.