Bill Gates | जग बदलासाठी तयार नाही, सायबर हल्ल्यांचा धोका वाढणार  
विश्वसंचार

Bill Gates | जग बदलासाठी तयार नाही, सायबर हल्ल्यांचा धोका वाढणार

‘एआय’वर बिल गेटस्‌ यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे मानवी जीवन आणि काम करण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. मात्र, या क्रांतीसोबत अनेक गंभीर आव्हानेही समोर येत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस्‌ यांनी इशारा दिला आहे की, जग अजूनही ‘एआय’च्या व्यापक परिणामांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार नाही. येत्या काही वर्षांत याचा थेट परिणाम रोजगारापासून ते सायबर सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेवर दिसून येईल.

बिल गेटस्‌ यांनी आपल्या ‘द टर्बुलेंट ‘एआय’ एरा इज हिअर’ या ब्लॉग पोस्टमध्ये ‘एआय’च्या या काळाला अत्यंत महत्त्वाचा बदल मानले आहे. त्यांच्या मते, पूर्वीच्या तांत्रिक बदलांना समाजात रुजण्यासाठी बराच वेळ लागायचा; पण ‘एआय’ अवघ्या काही वर्षांतच अनेक उद्योगांचे चित्र बदलून टाकेल. यासाठी सरकारने आतापासूनच रोजगाराच्या संधी टिकवून ठेवण्यासाठी धोरणे आखणे गरजेचे आहे; अन्यथा बेरोजगारीचा ताण वाढू शकतो. ‘एआय’मुळे होणाऱ्या बदलांचा मोठा फटका करिअरची सुरुवात करणाऱ्या नवोदित तरुणांना बसू शकतो. कंपन्या येत्या काळात ‘एंट्री-लेव्हल’ची अनेक कामे ‘एआय’कडून करून घेतील, जी सध्या नवीन कर्मचारी करतात. यामुळे सुरुवातीच्या नोकऱ्यांच्या संधी कमी होतील. सामान्यतः नवीन कर्मचारी वरिष्ठांसोबत काम करून अनुभव मिळवतात. जर अशा जागाच कमी झाल्या, तर तरुणांना अनुभव मिळवणे आणि करिअर घडवणे कठीण होईल. गेटस्‌ यांनी ‘एआय’ च्या गैरवापराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘एआय’ जसजसे अधिक सक्षम होईल, तसतसे सायबर गुन्हेगारांसाठी फसवणूक करणे, बनावट माहिती पसरवणे आणि सायबर हल्ले करणे सोपे होईल. डीपफेक व्हिडीओ आणि बनावट माहितीमुळे इंटरनेटवर खरे काय आणि खोटे काय, हे ओळखणे कठीण होईल. काही सरकारेही या शक्तिशाली ‘एआय’ प्रणालीचा वापर चुकीच्या उद्देशांसाठी करण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बिल गेटस्‌ ‘एआय’ तंत्रज्ञानावर बंदी घालण्याच्या किंवा ते रोखण्याच्या बाजूने नाहीत. वैद्यकीय, शिक्षण आणि शेती क्षेत्रात ‘एआय’चे अनेक मोठे फायदे आहेत. मात्र, यासाठी सरकार आणि प्रशासनाने रोजगार आणि सुरक्षेशी संबंधित धोक्यांवर आधीपासूनच उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT