इजिप्तमध्ये ममींवर रंगीत मण्यांचे 2500 वर्षे जुने कफन 
विश्वसंचार

Egypt Mummy : इजिप्तमध्ये ममींवर रंगीत मण्यांचे 2500 वर्षे जुने कफन

मृतांना ‌‘ऑसिरिस‌’ देवाचे रूप देण्याची होती प्रथा

पुढारी वृत्तसेवा

शिकागो : प्राचीन इजिप्तमधील लोकांनी सुमारे 2,500 वर्षांपूर्वी ममीभोवती गुंडाळण्यासाठी रंगीत मण्यांचे अत्यंत आकर्षक आणि तपशीलवार जाळे विणून कफन तयार केले होते. कापडात गुंडाळलेल्या ममींच्या वर हे मण्यांचे जाळे ठेवले जात असे. मृत व्यक्तीचे सुपीकतेचा आणि मृत्यूचा देवता ‌‘ऑसिरिस‌’ मध्ये रूपांतर व्हावे, या श्रद्धेचे ते प्रतीक होते.

मण्यांचे हे अनोखे कफन सध्या अमेरिकेतील ‌‘आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो‌’च्या संग््राहात आहे. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात संस्थेने हे कफन लक्सर येथील अमेरिकन प्रेसबिटेरियन मिशनचे संचालक रेव्ह. चॉन्सी मर्च यांच्याकडून खरेदी केले होते, ज्यांना प्राचीन इजिप्शियन कलेचे संग््राह करण्याची आवड होती. हे कफन 18 इंच लांब आणि 15.8 इंच रुंद (45.7 बाय 40 सेंटिमीटर) आहे, म्हणजेच याने मृत व्यक्तीचे डोके आणि छातीचा वरचा भाग सहज झाकता येऊ शकत होता. इजिप्तचे अभ्यासक एमिली टेटर यांनी या कलाकृतीचे सखोल विश्लेषण केले असून, त्यानुसार या मण्यांच्या जाळ्यात तीन मुख्य गोष्टी साकारण्यात आल्या आहेत : मानवी चेहरा : मृत व्यक्तीचा चेहरा प्रामुख्याने गडद निळ्या मण्यांपासून बनवला आहे, तर डोळे आणि चेहऱ्यावरील इतर हावभाव काळ्या, लाल आणि पिवळ्या मण्यांनी अमूर्त पद्धतीने दाखवले आहेत.

प्रसिद्ध ‌‘तुतानखामेन‌’च्या मुखवट्याप्रमाणेच यावर हिरवट-निळ्या मण्यांची एक कृत्रिम दाढी जोडली आहे. निळ्या मण्यांचा वापर आकाशदेवता ‌‘नट‌’ हिच्या सन्मानार्थ केला असावा, जिचे शरीर अनेकदा निळ्या आकाशातील ताऱ्यांच्या रूपाने दर्शवले जायचे. पंख असलेला स्कारब टोळ : चेहऱ्याच्या अगदी खाली बहुरंगी मण्यांनी पंख असलेला स्कारब कीटक विणला आहे. हा बहुधा निर्मिती आणि नूतनीकरणाचे प्रतीक असलेल्या सूर्यदेवता ‌‘खेपरी‌’चे आवाहन करण्यासाठी असावा. सामान्यतः ममी गुंडाळताना स्कारबचे ताईत वेगळे ठेवले जातात; परंतु या कलाकृतीत ते कफनवरच मण्यांच्या साहाय्याने साकारले आहे. मोठा गळपट्टा : स्कारबच्या खाली गडद निळ्या, लाल, पिवळ्या, काळ्या आणि फिकट निळ्या मण्यांचा वापर करून एक सुंदर गळपट्टा तयार केला आहे, ज्यावर पिवळी कमळाची फुले आणि लाल फुलांचे पेंडंटस्‌‍ दिसतात. एमिली टेटर यांच्या मते, ममीला लाल रंगाच्या कापडात गुंडाळल्यानंतर त्यावर हे मण्यांचे जाळे पाठीमागून दोऱ्यांनी बांधले जायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT