लंडन : उत्तर लक्झमबर्गमधील एका शेतात लागलेल्या शोधाने जगभरातील इतिहासकार आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील ‘होल्जथुम’ गावाजवळ जमीन खणताना तब्बल 141 रोमन सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे. हा खजिना सुमारे 1,700 वर्षे मातीखाली गाडला गेला होता. सुरुवातीला हा धातूचा एक छोटा तुकडा वाटला होता; परंतु सखोल तपासणीअंती हा शोध रोमन सामाज्याच्या अंतिम कालखंडातील अनेक ऐतिहासिक रहस्यांवरून पडदा उठवणारा ठरला आहे.
तज्ज्ञांच्या मते, या नाण्यांचे आर्थिक मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो युरो असू शकते; परंतु त्यांचे ऐतिहासिक महत्त्व याहून कितीतरी पटीने अधिक आहे. रोमन इतिहासातील अनेक अनसुलझे पैलू समजून घेण्यासाठी सध्या या नाण्यांचा अभ्यास आणि जतन केले जात आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळालेली ही सोन्याची नाणी विखुरलेली नव्हती, तर एकाच ठिकाणी सुरक्षितपणे साठवून ठेवण्यात आली होती. या खजिन्यात ‘सॉलिडी’ नावाचे 141 सोन्याचे शिक्के मिळाले आहेत. या नाण्यांची निर्मिती चौथी आणि पाचवी शतकाच्या दरम्यान झाली असावी, जेव्हा रोमन सामाज्य आपल्या पडत्या काळातून जात होते. त्या काळात रोमन सामाज्यावर सातत्याने परकीय आक्रमणे, आर्थिक संकट आणि अंतर्गत राजकीय संघर्ष होत होते. याच कारणामुळे, एखाद्या श्रीमंत कुटुंबाने किंवा प्रभावशाली व्यक्तीने आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ती जमिनीत गाडली असावी, असा अंदाज आहे. मात्र, ती व्यक्ती किंवा कुटुंब हा खजिना परत काढण्यासाठी जिवंत राहिले नसावे आणि त्यामुळे हा खजिना शतकानुशतके मातीआड राहिला.
या शोधाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ नाण्यांची संख्या नसून, त्या नाण्यांवर कोरलेली वेगवेगळ्या रोमन समाटांची चित्रे हे आहे. ही नाणी त्या काळातील राजकीय अस्थिरतेची साक्ष देतात, जेव्हा वारंवार सत्ता बदलत होती आणि कोणत्याही राजाचे शासन दीर्घकाळ टिकत नव्हते. युद्ध, सत्तासंघर्ष आणि वाढत्या असुरक्षिततेमुळे लोकांनी आपली धनसंपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असावे. या खजिन्यात काही अशी अत्यंत दुर्मीळ नाणी सापडली आहेत, ज्यांवर रोमन शासक युजीनियस याचे चित्र आहे. युजीनियसचा कार्यकाळ अत्यंत छोटा आणि वादाने वेढलेला होता. त्याने 390 च्या दशकाच्या सुरुवातीला केवळ काही वर्षे राज्य केले आणि नंतर सत्तासंघर्षात त्याचा पराभव झाला. त्यामुळे त्याच्या नावाचे शिक्के जगभरात अत्यंत दुर्मीळ मानले जातात. एवढ्या उत्तम स्थितीत आणि एकाच ठिकाणी युजीनियसच्या काळातील नाणी मिळणे अत्यंत असामान्य मानले जात असून, हे नाणे त्या काळातील राजकीय अनिश्चिततेची गोष्ट सांगते.