सेऊल : घरांना आधुनिक आणि ऊर्जाक्षम बनवण्यासाठी दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी शोध लावला आहे. त्यांनी लाकडापासून अशी एक ‘स्मार्ट विंडो’ (खिडकी) तयार केली आहे, जी सूर्याच्या घातक अतिनील किरणांना रोखण्यासोबतच घराचे तापमानही नियंत्रित करेल. विशेष म्हणजे, ही खिडकी चालवण्यासाठी कोणत्याही विजेची किंवा सेन्सरची गरज भासणार नाही.
दक्षिण कोरियाच्या ‘हानबाट नॅशनल युनिव्हर्सिटी’ आणि ‘कोंगजू नॅशनल युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी यावर संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांनी यासाठी ‘बाल्सा’ नावाच्या लाकडाचा वापर केला. या लाकडावर प्रक्रिया करून त्यात ‘लिक्विड क्रिस्टल’ मिसळण्यात आले. या प्रक्रियेमुळे लाकडाचा नैसर्गिक रंग बदलून ते एखाद्या काचेसारखे पारदर्शक आणि चमकदार बनले आहे. आजकाल बाजारात असलेल्या स्मार्ट खिडक्यांना चालवण्यासाठी विजेची गरज असते, मात्र या नवीन लाकडी खिडकीला कोणत्याही बाह्य ऊर्जेची गरज नाही.
1. तापमान नियंत्रण : जेव्हा खोली थंड असते, तेव्हा ही खिडकी पूर्णपणे पारदर्शक होते, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश आत येऊन खोली उबदार होते.
2. स्वयंचलित बदल : जेव्हा खोलीचे तापमान वाढते, तेव्हा ही खिडकी आपोआप अपारदर्शक बनते, ज्यामुळे उष्णता रोखली जाते.
3. कमी प्रकाश : संशोधनानुसार, सामान्य तापमानात ही खिडकी केवळ 28 टक्के प्रकाश आत येऊ देते. पण तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्यावर ती आपली क्षमता वाढवून प्रकाश आणि उष्णता अधिक प्रभावीपणे रोखते. ही खिडकी केवळ दिसायला आकर्षक नाही, तर ती घराची प्रायव्हसी (व्हिजिबिलिटी) देखील नियंत्रित करू शकते. विटा आणि दगडांच्या घरांमध्ये ही खिडकी उष्णता आणि थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय ठरू शकते. यामुळे एअर कंडिशनिंग आणि हीटिंगवर होणारा विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सूर्याची हानिकारक किरणे रोखणारी ही ‘ट्रान्सपरंट’ लाकडी खिडकी लवकरच जागतिक बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.