Japan samurai women 
विश्वसंचार

Japan samurai women: जपानच्या समुराई वर्गात महिलांचाही होता समावेश...

संशोधकांच्या मते, समुराई वर्गात महिलांचे अस्तित्व केवळ होतेच असे नाही, तर त्यांनी युद्धभूमीवर शस्त्रेही उपसली होती.

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : जपानचे ‌‘समुराई‌’ म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सन्मानाने जगणारे आणि युद्धकलेत निपुण असलेले पुरुष योद्धे. चित्रपट आणि संग्रहालयांमध्येही त्यांना बहुतेकदा पुरुषांच्याच रूपात दाखवले जाते. मात्र, ‌‘समुराईंमध्ये महिला होत्या का?‌’ या प्रश्नाचा शोध घेतला असता एक रंजक सत्य समोर आले आहे. संशोधकांच्या मते, समुराई वर्गात महिलांचे अस्तित्व केवळ होतेच असे नाही, तर त्यांनी युद्धभूमीवर शस्त्रेही उपसली होती.

अकिता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक शॉन ओ‌’रेली यांनी ‌‘लाईव्ह सायन्स‌’ला दिलेल्या माहितीनुसार, समुराई हा केवळ योद्ध्यांचा समूह नसून तो एक संपूर्ण सामाजिक वर्ग होता, ज्याला ‌‘बुशी‌’ म्हटले जायचे. या वर्गात जन्मलेली कोणतीही व्यक्ती ‌‘समुराई‌’ मानली जाई. ज्याप्रमाणे या वर्गातील पुरुषाने कधी शस्त्र हातात घेतले नसले, तरी तो समुराईच मानला जाई, तसेच या वर्गात जन्मलेली प्रत्येक महिला ही ‌‘महिला समुराई‌’ होती. युद्धात लढणाऱ्या महिलांना ‌‘ओन्ना-मुशा‌’ म्हणजेच ‌‘महिला योद्धा‌’ म्हणून ओळखले जाते. त्या युद्धात किती वेळा सहभागी झाल्या, यावर इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.

काही तज्ज्ञांच्या मते या घटना दुर्मीळ होत्या, तर काहींच्या मते त्या वारंवार घडत असत. ऐतिहासिक नोंदीनुसार, या महिला योद्धांची संख्या आजच्या कल्पनेपेक्षा कमी असली, तरी त्यांचे योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नक्कीच नाही. महिला समुराईंच्या पराक्रमाचे सर्वात भक्कम पुरावे 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजेच समुराई परंपरा संपुष्टात येण्याच्या काळात मिळतात. 1868-1869 दरम्यान जपानमध्ये ‌‘बोशिन युद्ध‌’ (नागरी युद्ध) झाले. यावेळी तोकुगावा शोगुनेटच्या समर्थकांनी समाटाच्या समर्थकांविरुद्ध लढा दिला.

या युद्धादरम्यान ‌‘ऐझू‌’ प्रांताच्या राजधानीला वेढा घातला गेला असताना, महिला समुराईंनी स्वतःचे एक स्वतंत्र पथक तयार केले होते, ज्याला ‌‘जोशिगुन‌’ असे नाव देण्यात आले. वेस्टर्न वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डायना राईट यांच्या एका लेखानुसार, या ‌‘जोशिगुन‌’ पथकात साधारण 20 ते 30 महिला होत्या, ज्यापैकी 10 जणींची नावे आजही इतिहासात नोंदवलेली आहेत. या पथकाचे अनधिकृत नेतृत्व नाकानो ताकेको या 22 वर्षांच्या तरुणीने केले होते. तिने अत्यंत धैर्याने शत्रूचा मुकाबला केला, जो आजही महिला समुराईंच्या शौर्याचे प्रतीक मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT