Woman Lives With 60000 Snakes | ६० हजार विषारी सापांसोबत राहते ही तरुणी! 
विश्वसंचार

Woman Lives With 60000 Snakes | ६० हजार विषारी सापांसोबत राहते ही तरुणी!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : सहसा लोक अन्नधान्य किंवा फळांची शेती करतात; पण चीनमधील एका तरुणीने चक्क जगातील सर्वात घातक सापांची शेती करून सर्वांना थक्क केले आहे. मृत्यूच्या सावलीत काम करत या तरुणीने केवळ आपल्या भीतीवर विजय मिळवला नाही, तर आज ती ६० हजार विषारी सापांची ‌‘मालकीण’ बनली आहे.

चीनच्या गुआंग्शी प्रांतातील गुइलिन शहरात राहणाऱ्या ‌‘किन‌’ हिचा जन्म १९९५ मध्ये झाला. पदवीनंतर शहरात स्थायिक होऊन मोठ्या पगाराची नोकरी आणि आलिशान आयुष्य जगण्याचे तिचे स्वप्न होते. तिला तशी नोकरीही मिळाली. मात्र, एक दिवस अचानक तिचे मन कामावरून उडाले. तिचे वडील गावात अनेक वर्षांपासून कोबा आणि ‌‘फाईव्ह-स्टेप‌’ व्हायपर यांसारख्या विषारी सापांचे पालन करत होते. वाढत्या वयानुसार त्यांना हा व्यवसाय सांभाळणे कठीण जाऊ लागले, तेव्हा किनने शहरातले सुख सोडून आपल्या गावी परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज किन एकटी ६०,००० हून अधिक विषारी सापांचे फार्म सांभाळते. यामध्ये सुमारे ५०,००० ‌‘पिट व्हायपर‌’ आणि १०,००० कोबा सापांचा समावेश आहे.

कोबाच्या एका दंशाने माणूस अवघी पाच पावलेच चालू शकतो, असे म्हटले जाते. मात्र, किन दररोज या हजारो सापांना न डगमगता आपल्या हाताने खाऊ घालते. सापांना उत्तम आहार मिळावा आणि त्यांच्या शरीरात अधिक विष तयार व्हावे, यासाठी ती स्वतः उंदीर आणि सरड्यांचीही शेती करते. एका कोबाच्या खाद्यावर महिन्याला साधारण ७०० रुपये खर्च होतो. सोशल मीडियावर किन ‌‘द गर्ल हू कलेक्टस्‌ स्नेक वेनम‌’ या नावाने प्रसिद्ध आहे. ती आपल्या व्हिडीओंमधून साप पालनाचे तंत्र आणि विषापासून वाचण्याचे उपाय सांगते. सर्व खर्च वजा जाता, किन वर्षाला साधारण १० लाख युआन म्हणजेच १.३५ कोटी रुपयांहून अधिक नफा कमावते. जे आलिशान आयुष्य तिने शहरात पाहिले होते, ते आज ती सापांच्या शेतीतून जगतेय. सापाचे विष औषध निर्मितीत वापरले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT