बीजिंग : सूर्यप्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, पण त्याचा अतिरेक किती धोकादायक ठरू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण चीनमध्ये समोर आले आहे. कडाक्याच्या उन्हात दोन तास पाठ उघडी ठेवून सूर्यस्नान (सनबाथ) घेणे एका 67 वर्षीय वृद्ध महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या घटनेनंतर तिला ब्रेन हॅमरेजचा (मेंदूत रक्तस्त्राव) तीव्र झटका आला आणि ती कोमात गेली.
सदर महिला तीव्र उन्हात सुमारे दोन तास झोपली होती. घरात परतल्यानंतर काही वेळातच ती अचानक कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान केले. या घटनेने चीनमध्ये खळबळ उडाली असून, दीर्घकाळ सूर्यस्नान करण्याच्या धोक्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दीर्घकाळ कडक उन्हात राहिल्याने शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते, ज्यामुळे ‘हीटस्ट्रोक’चा धोका निर्माण होतो. अशा स्थितीत रक्तदाब अनियंत्रितपणे वाढू शकतो, जो मेंदूतील रक्तस्रावाचे अर्थात ब्रेन हॅमरेजचे एक प्रमुख कारण ठरू शकतो. चीनमधील महिलेच्या बाबतीतही नेमके हेच घडले असावे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.