फोर्थ स्मिथ (अरकांसस) : लहानपणी ज्या खेळाचा तिरस्कार केला, त्याच खेळात जागतिक विक्रम रचण्याची किमया अमेरिकेतील मेरेडिथ स्मिथ हिने करून दाखवली आहे. केवळ विक्रम करण्यासाठी नाही, तर आपला 80 पौंड (सुमारे 36 किलो) वजन घटवण्याचा खडतर प्रवास जगासमोर मांडण्यासाठी तिने 55 टी-शर्ट घालून हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्ने तिच्या या विक्रमावर आता अधिकृत मोहर उमटवली आहे.
मेरेडिथने या विक्रमासाठी अत्यंत कठीण सराव केला होता. सरावादरम्यान तिने चक्क 80 टी-शर्ट अंगावर चढवून धावण्याचा सराव केला होता. तिने 80 ही संख्या मुद्दाम निवडली होती. कारण, तिने आपल्या आयुष्यात आतापर्यंत 80 पौंड वजन कमी केले आहे. मात्र, प्रत्यक्ष शर्यतीत उष्णता आणि हालचालींचा विचार करून तिने 55 टी-शर्ट घालून धावण्याचा निर्णय घेतला आणि जेनिफर रोमानो हिचा विक्रम मोडीत काढला.
मेरेडिथ सांगते, शाळेत असताना मला धावण्याचा प्रचंड तिरस्कार होता. कुणी पैसे दिले असते तरी मी एक मैल धावले नसते. खेळांमध्ये धावण्याकडे नेहमीच शिक्षा किंवा शिस्त म्हणून पाहिले जात असे; पण 2013 मध्ये वजन कमी करण्यासाठी मी धावण्यास सुरुवात केली आणि आज या समुदायाने मला जे प्रेम दिले, त्याने माझे आयुष्य बदलले.
मेरेडिथने 3 तास 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात शर्यत पूर्ण. अंगावर टी-शर्टचे वजन वाढवून धावणे म्हणजे पुन्हा आपल्या जुन्या वजनासह धावण्यासारखे होते, ज्यामुळे आपण किती प्रगती केली याची तिला जाणीव झाली. धावणे हे तुम्ही कसे दिसता यावर नाही, तर तुम्हाला कसे वाटते यावर अवलंबून आहे. लहानपणापासून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचे मेरेडिथचे स्वप्न होते. ‘कठोर परिश्रम आणि स्वप्नांचा पाठलाग केल्यास फळ नक्की मिळते, हे मला स्वतःला आणि जगाला सिद्ध करायचे होते,’ असे तिने आनंदाने सांगितले. तिची ही कामगिरी केवळ खेळातील विक्रम नसून, आरोग्यासाठी लढणार्या प्रत्येकासाठी एक आशेचा किरण ठरली आहे.