न्यूजर्सी : मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत की एका नवीन प्रवासाची सुरुवात? अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एरिका टेट या तरुणीने या प्रश्नाचे उत्तर आपल्या थरारक अनुभवातून दिले आहे. एका भीषण अपघातानंतर तब्बल 7 तास एरिका मृत्यूच्या दारात होती आणि यादरम्यान तिने जे पाहिले ते ऐकून जगभरातील लोक थक्क झाले आहेत.
2015 मध्ये, 22 वर्षांची असताना एरिका पॅलिसेड्स क्लिफ्सवर ट्रेकिंग करत होती. यादरम्यान 60 फूट उंचीवरून ती खाली कोसळली. या भीषण पडझडीत तिचा पाठीचा कणा तुटला, बरगड्या आणि हात फ्रॅक्चर झाले आणि दोन्ही फुफ्फुसांना गंभीर दुखापत झाली. मदतीसाठी तिने फोन केला; पण रेस्क्यू टीमला तिला शोधण्यासाठी 7 तास लागले. हे 7 तास ती क्लिनिकली मृत घोषित करण्याच्या स्थितीत होती.
दुसऱ्या जगातील तो अनुभव एरिकाने यूट्यूब चॅनेलवर शेअर करताना सांगितले की, डोंगरदरीत पडल्यावर तिचा आत्मा शरीरापासून वेगळा झाला आणि तिला आपले स्वतःचे तुटलेले शरीर खाली पडलेले दिसले. तिला जाणवले की शरीर म्हणजे आपण नसून आत्मा वेगळा आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एखाद्या चित्रपटासारखी तिच्या डोळ्यासमोरून गेली. तिच्या कृतींमुळे इतरांना किती त्रास झाला किंवा आनंद मिळाला, याची स्पष्ट जाणीव तिला झाली. तिला एका तेजस्वी प्रकाशाने खेचून घेतले, ज्याला ती ईश्वर किंवा युनिव्हर्सल कॉन्शसनेस म्हणते. तो प्रकाश प्रेमाने भरलेला होता.
एरिकाच्या दाव्यानुसार, तिथे कोणतेही देवदूत किंवा मृत नातेवाईक तिला दिसले नाहीत. तिथे कोणताही स्वर्ग किंवा नरक असा भेदभाव नव्हता. तिला फक्तअसा संदेश मिळाला की, आपण सर्वजण एकाच ऊर्जेचे बनलेले आहोत आणि संपूर्ण सृष्टी एकमेकांशी जोडलेली आहे. या अनुभवापूर्वी एरिका नास्तिक होत; मात्र आता ती पूर्णपणे आध्यात्मिक झाली आहे. तिच्या मते, मृत्यू हा शेवट नसून, एक भ्रम आहे आणि आपण सर्व अमर आहोत.