वॉशिंग्टन : अमेरिकेतील ३८ वर्षीय डिएड्रे कीन यांच्यासाठी धावणे हा काही नवा छंद नाही. त्यांनी यापूर्वीच ६० हून अधिक मॅरेथॉन पूर्ण केल्या होत्या. मात्र, २०२६ मध्ये त्यांनी स्वतःसाठी एक खास ध्येय निश्चित केले होते. एकाच वर्षात जगातील सात मोठ्या मॅरेथॉन पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. गेल्या वर्षी त्यांचा ब्रायन यांच्याशी विवाह झाला होता. दोघेही कुटुंब वाढवण्याचा विचार करत होते. आई होण्याच्या नियोजनाला अजून थोडा वेळ लागू शकेल, असे डिएड्रे यांना वाटले. याच विचारातून त्यांनी अनेक मोठ्या शर्यतींसाठी नावनोंदणी केली. त्यांच्या यादीत सात मोठ्या मॅरेथॉनशिवाय आयर्लंडमधील एक ट्रेल मॅरेथॉन, दोन अल्ट्रामॅरेथॉन आणि एका आयर्नमॅन स्पर्धेचाही समावेश होता. मात्र, हा प्रवास अशा वळणावर येईल, जिथे तयारीसोबतच त्यांना आपल्या गरोदरपणाचीही काळजी घ्यावी लागेल, याची त्यांना कल्पना नव्हती.
डिएड्रे यांचा मॅरेथॉनचा प्रवास मार्चमध्ये टोकियोपासून सुरू झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी बोस्टन आणि लंडन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. या शर्यतींदरम्यान धावण्याची गती पूर्वीसारखी राहिली नसल्याचे त्यांना जाणवू लागले. शरीरातही काही बदल होत असल्याचे त्यांना वाटत होते. त्यानंतर त्यांनी प्रेग्नेंसी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. ही बातमी त्यांच्या आणि पती ब्रायन यांच्यासाठी आनंदासोबतच थोडीशी चिंताही घेऊन आली. आता प्रश्न हा होता की, गरोदरपणात इतक्या लांब पल्ल्यापर्यंत धावणे कितपत योग्य ठरेल.
गरोदरपणाची माहिती मिळाल्यानंतर डिएड्रे यांनी आपले स्वप्न पूर्णपणे सोडून देण्याऐवजी डॉक्टरांशी चर्चा केली. सल्ला आणि स्वतःची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन त्यांनी पुढील संपूर्ण नियोजन केले. आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅरेथॉनसारख्या अधिक कठीण स्पर्धांपासून त्यांनी दूर राहण्याचा निर्णय घेतला. तसेच कोणत्याही शर्यतीत वेळ सुधारण्याचा किंवा वेगाने धावण्याचा ताण न घेण्याचेही ठरवले. गरज पडल्यास धावण्याऐवजी चालण्याचा मार्ग स्वीकारला. डॉक्टरांनी त्यांना आहार आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू न देण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. स्नायूंमध्ये पेटके येणे किंवा कोणताही त्रास जाणवल्यास व्यायाम थांबवण्याचा सल्लाही देण्यात आला. अशा प्रकारे डिएड्रे यांनी आपल्या ध्येयात आणि आरोग्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला.
गरोदरपणातही डिएड्रे यांनी सिडनी, बर्लिन आणि शिकागो मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. सिडनीमध्ये धावताना त्या २५ आठवड्यांच्या गरोदर होत्या. बर्लिन मॅरेथॉनच्या वेळी त्या २९ व्या आठवड्यांत होत्या, तर शिकागोमध्ये त्या ३१ व्या आठवड्यांत होत्या. त्यानंतर आला नोव्हेंबर महिना. डिएड्रे न्यूयॉर्क मॅरेथॉनसाठी सज्ज झाल्या. त्या वेळी त्या गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यांत होत्या. असे असूनही त्यांनी ४२.२ किलोमीटरची शर्यत ४ तास, ६ मिनिटे आणि ५५ सेकंदांत पूर्ण केली. या शर्यतीसह त्यांनी २०२६ मध्ये जगातील सात मोठ्या मॅरेथॉन पूर्ण करण्याचे आपले ध्येय गाठले. त्यांच्यासाठी ही केवळ आणखी एक पदक किंवा शर्यत पूर्ण करण्याची बाब नव्हती, तर एका दीर्घकालीन स्वप्नाची पूर्तता होती.