Woman Catches King Cobra | महिलेने हातानेच पकडला दहा फुटी किंग कोब्रा  
विश्वसंचार

Woman Catches King Cobra | महिलेने हातानेच पकडला दहा फुटी किंग कोब्रा

पुढारी वृत्तसेवा

बगाहा (बिहार) : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. बिसहा गावातील रहिवासी असलेल्या जानकी देवी या धाडसी महिला स्नेक कॅचरने कोणत्या साधनांशिवाय हातानेच आपल्या प्राणाची बाजी लावून सुमारे १० फूट लांब किंग कोब्राला पकडले. मात्र, दुर्दैवाने यादरम्यान सापाने त्यांना दंश केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दिलासादायक बाब म्हणजे उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली. हाथी मलखनता येथील रहिवासी मुनिलाल तिवारी यांच्या घरात जवळच्या जंगलातून आलेला एक प्रचंड मोठा किंग कोब्रा घुसला. घरातून अचानक सापाचा तीव्र फुत्कार ऐकू आल्याने कुटुंबात एकच खळबळ उडाली आणि भीतीने सर्वजण घराबाहेर पळाले. आरडाओरडा ऐकून गावातील लोक गोळा झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी परिसरातील प्रसिद्ध ‘स्नेक कॅचर’ जानकी देवी यांना पाचारण केले. माहिती मिळताच जानकी देवी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचल्या. घरात कोपऱ्यात बसलेल्या खतरनाक किंग कोब्राला पाहूनही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी अत्यंत संयमाने आणि अथक प्रयत्नांनंतर त्याला सुरक्षितपणे पकडले आणि वन विभागालाही याची माहिती दिली.

सापाला पकडल्यानंतर जानकी देवी त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी ‘सहा आरडी'च्या दिशेने घेऊन जात होत्या. त्याच वेळी अचानक त्यांच्या हाताची सापावरील पकड थोडी सैल झाली. संधी साधून त्या विषारी कोब्राने जानकी देवी यांच्या हाताला दंश केला. साप चावल्याचे समजताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने नेपाळमधील त्रिवेणी येथील सर्पदंश उपचार केंद्रात दाखल केले, जिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो विषारी सापांचे रेस्क्यू केले आहे. साप पकडण्याच्या या धोकादायक प्रवासात त्या आतापर्यंत चार वेळा सर्पदंशाचा शिकार झाल्या आहेत. मात्र, दरवेळी मजबूत इच्छाशक्ती आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे त्या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतल्या आहेत. आता हाच पाचवा प्रसंग आहे, जेव्हा त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT