Shanti Rathva | चेटकीण ठरवलेली शांती बनली बिझनेस वूमेन  
विश्वसंचार

Shanti Rathva | चेटकीण ठरवलेली शांती बनली बिझनेस वूमेन

पुढारी वृत्तसेवा

वडोदरा : एकेकाळी जिला चेटकीण ठरवून अमानुष मारहाण करण्यात आली आणि गावातून हाकलून दिले, तीच महिला आज शेकडो स्त्रियांसाठी प्रेरणास्रोत बनली आहे. दाहोद जिल्ह्यातील चौपटपल्ली गावातील शांती राठवा यांची ही संघर्षगाथा केवळ एका महिलेचा विजय नसून अंधश्रद्धेवर विज्ञानाने मिळवलेला विजय आहे.

सुमारे 12 वर्षांपूर्वी शांती राठवा यांच्यावर अंधश्रद्धेतून चेटकीण असल्याचा शिक्का मारण्यात आला. स्वतःच्या कुटुंबाने आणि गावकर्‍यांनी त्यांना बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. बेघर झालेल्या शांती यांनी काही दिवस रस्त्यावर काढले, मात्र एका धार्मिक संस्थेने त्यांना आधार दिला. तिथेच त्यांची भेट स्वाती बेडेकर यांच्याशी झाली, ज्या महिलांना सॅनिटरी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण देतात. सातवीपर्यंत शिकलेल्या शांती यांनी जिद्दीने हे काम आत्मसात केले.

स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी जेव्हा गावकर्‍यांनी त्यांना जमीन देण्यास नकार दिला, तेव्हा एका हनुमान मंदिराच्या पुजार्‍याने मदतीचा हात पुढे केला. मंदिर परिसरातच त्यांनी छोटे युनिट सुरू केले. सुरुवातीला लोक त्यांच्यावर दगडफेक करायचे, तर महिला भीतीपोटी जवळ येत नसत. मात्र, शांती डगमगल्या नाहीत. सरकारी योजनेतून मशिन खरेदी करून त्यांनी काम वाढवले. आज त्यांच्या युनिटमध्ये 20 महिला काम करत असून दिवसाला सुमारे 2,000 सॅनिटरी पॅड तयार केले जातात.

आज शांती यांनी तयार केलेले सॅनिटरी पॅड 15 गावांमधील अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोहोचत आहेत. केवळ रोजगारच नाही, तर त्या आता गावागावांत जाऊन आपल्या संघर्षाची कहाणी सांगतात आणि डाकीण प्रथेसारख्या कुप्रथांविरुद्ध महिलांना जागरूक करत आहेत. ज्या समाजाने एकेकाळी त्यांचा धिक्कार केला, तोच समाज आज त्यांना सन्मानाने पाहत आहे. कष्टाने आणि धैर्याने नशीब कसे बदलता येते, याचे शांती राठवा हे एक जिवंत उदाहरण ठरल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT