टेक्सास: अंधश्रद्धेच्या गर्तेत अविकसित किंवा विकसनशील देशच अडकलेले आहेत असे नाही. युरोप-अमेरिकेतही काळ्या जादूचे, भुताखेताचे अनेक प्रकार समोर येत असतात. आता अमेरिकेत टेक्सासच्या समुद्रकिनार्यावर या 'विकसित' म्हणून मिरवणार्या 'महासत्ता' अमेरिकेतील काळ्या जादूचे नमुने वाहत आले आहेत. येथील समुद्रकिनारी रहस्यमय 'विच बॉटल्स' म्हणजेच चेटकिणीच्या बाटल्या वाहून आल्याचा, दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे संशोधकही त्या उघडण्यास घाबरत आहेत! तज्ज्ञ जेस टनेल यांना या बाटल्या 15 नोव्हेंबर रोजी टेक्सासमधील कॉर्पस क्रिस्टीजवळील समुद्रकिनार्यावर दिसून आल्या. त्यांना 'विच बाटल्या' असे म्हटले जात आहे. या बाटलांच्या आत लाकूड, पानं आणि काही वनस्पती दिसत होत्या. त्या पाण्यात कोणी आणि का टाकल्या असतील हे कोणालाही माहिती नाही; तर एका बाटलीला काचेभोवती 'गुजनेक बार्नाकल' गुंडाळलेले होते. ज्यामुळे तज्ज्ञांना शंका होती की, या बाटल्या बर्याच काळापासून पाण्यात बुडालेल्या होत्या. टनेलने सांगितले की, 2017 पासून अशा आठ बाटल्या या परिसरात वाहून आल्या आहेत.
या बाटल्यांमध्ये काही 'मंत्र आणि शापित गोष्टी' असल्याच्या अफवा ऐकून ते उघडण्याचा धोका पत्करण्यास टनेल तयार नाही. तसेच, त्यांच्या पत्नीने यापैकी एकही बाटली घरात आणण्यास नकार दिला आहे. संपूर्ण ब्रिटनमध्येही अशा बाटल्या सापडणे हे काही नवीन नाही. आतापर्यंत अशा सुमारे 200 बाटल्या सापडल्या आहेत. ज्यांनी या बाटल्या उघडल्या त्यांना त्यामध्ये मानवी केसांपासून ते नखापर्यंत अनेक गोष्टी सापडल्या. मॅकगिल युनिव्हर्सिटी ऑफिस ऑफ सायन्स अँड सोसायटीतील तज्ज्ञांनी सांगितले की, 16 व्या आणि 17 व्या शतकात तथाकथित चेटकिणींचा असा विश्वास होता की, त्यांच्या जादूमुळे रोग बरे होतात आणि वाईट नजर दूर होऊ शकते. या चेटकिणीच्या बाटलीच्या माध्यमातून नकारात्मकता थांबवता येते, असं मानलं जातं. पण, ही बाटली उघडली, तर ती जो कुणी उघडेल त्याच्यावर याचा वाईट परिणाम होतो, असं सांगितलं जातं.